Join us  

Video: 'वेलकम ३' चा टीझर आला, जंगलात अक्षयसोबत रविना; दिग्गज कलाकारांची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 3:43 PM

सदाबहार कॉमेडी असलेला 'वेलकम' आणि वेलकम २ सिनेमा 'वेलकम 3' नवा सिनेमा २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई - आपल्या जबरदस्त अभिनयामुळे कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रविना टंडन. आजवर या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, गेल्या १९ वर्षात ही जोडी एकदाही एकत्र आली नाही. त्यामुळे या दोघांना रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक होते. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होत आहे. २००४ नंतर प्रथमच या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केला असून वेलकम ३ चित्रपटाच्या प्रोमोमध्ये अक्षय आणि रविना जंगलात दिसले आहेत.

सदाबहार कॉमेडी असलेला 'वेलकम' आणि वेलकम २ सिनेमानंतर आता 'वेलकम 3' २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये अक्षय आणि रविना टंडनने स्क्रीन शेअर केली आहे. नुकताच चित्रपटाचा प्रोमो रिलीज करण्यात आला. खिलाडीकुमार अक्षयकुमारच्या वाढदिवसादिनीच हा टीझर रिलीज करण्यात आला असून दिग्गजांची मांदियाळी या सिनेमात दिसणार आहे. अर्शद वारसी, संजय दत्त, सुनील शेट्टी, परेश रावल, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, किकू शारदा, मिका सिंग, दलेर मेहंदी यांचेही चेहरे सिनेमाच्या प्रोमोत पाहायला मिळाले आहेत. २० डिसेंबर रोजी हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

'वेलकम टू द जंगल' नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अहमद खान यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत अक्षयकुमार दिसत आहे. त्यासोबत,  रविना टंडनसह अनेक बड्या कलाकारांची एंट्री झाल्याचं प्रोमोमध्ये दिसून येत आहे. मात्र, वेलकम आणि वेलकम २ गाजवणाऱ्या नाना पाटकेरांचा लूक अद्यापही प्रोमोत पाहायला मिळाल नाही. 

दरम्यान, या नव्या भागात नाना पाटेकर आणि अनिल कपूर नसल्याचं सांगण्यात येत आहे. प्रोमोतूनही दोघेही गायब आहेत. मात्र, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे २००४ मध्ये रविना आणि अक्षय कुमार ऑन-मॅन अॅट वर्कमध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर ते फारसे कुठे दिसले नाहीत. यापूर्वी या जोडीने खिलाडियों का खिलाडी, बारूद, किमत, दावा, पोलिस फोर्स यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे, १९ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारसिनेमाबॉलिवूडपरेश रावल