परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला आणि सर्वांना धक्का बसला. परेश रावल यांच्या या निर्णयाने 'हेरा फेरी ३' बनणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 'हेरा फेरी ३'निमित्ताने बाबूभैय्या, श्याम, राजू हे प्रेक्षकांचं लाडकं त्रिकूट पुन्हा एकत्र येणार होतं. परंतु आता परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्याने प्रेक्षकांना धक्का बसलाय. अशातच सुनील शेट्टीने परेश रावल यांच्या सिनेमातील एक्झिटवर भावुक प्रतिक्रिया दिली आहे.
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यावर सुनील काय म्हणाला
नुकतंच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टाने परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यावर भावुक प्रतिक्रिया दिली आहे. सुनील म्हणाला, "आम्ही हेरा फेरी ३ च्या प्रोमोचं शूटिंग केलं होतं. मी, परेश आणि अक्षय त्यावेळी होतो. असं वाटलंच नाही की, २५ वर्षांनंतर आम्ही तिघं प्रियदर्शनसोबत हेरा फेरी ३ साठी एकत्र आलोय. आमच्या तिघांमधली केमिस्ट्री, समजूतदारपणा खूप कमाल आहे. त्यामुळे परेशजींच्या या निर्णयाने मला धक्का बसला."
"परेशजींनी काही कारणास्तव हेरा फेरी करत नाही, हे स्वतः सांगितलं. आम्ही या सिनेमासाठी खूप उत्सुक होतो. फक्त मीच नाही तर आमचं कुटुंब, आमचे चाहतेही खूप उत्सुक होते. अहान बाहेर होता त्यामुळे त्याने मला हे सांगितलं. काय झालं नक्की? असं त्याने मला विचारलं." अशाप्रकारे सुनील शेट्टीने खुलासा केला. आता परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यानंतर त्यांच्याजागी कोणता अभिनेता दिसणार, 'हेरा फेरी ३'चं शूटिंग होणार का की सिनेमा डब्यात जाणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.