Join us  

अशाप्रकारे सोनाली बेंद्रेने मुलगा रणवीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 1:15 PM

सोनालीने रणवीरच्या तेराव्या वाढदिवसादिवशी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.  

ठळक मुद्देसोनाली रणवीरला करतेय मिससोनालीने रणवीरला इंस्टाग्रामवर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहे. त्यामुळे ती तिचा मुलगा रणवीर बहलला खूप मिस करते आहे. असे पहिल्यांदाच घडले आहे की सोनाली रणवीरच्या १३व्या वाढदिवसादिवशी त्याच्यासोबत नाही. त्याच्या या खास दिवशी सोनालीने त्याच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आणि एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.  

सोनालीने मुलगा रणवीरच्या तेराव्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, रणवीररर... माझा सुर्य, माझा चंद्र, माझा तारा, माझा आकाश... ठीक आहे, कदाचित मी थोडी मेलोड्रामाटिक आहे. पण, तुझा १३ वा जन्मदिवस ह्या गोष्टींचा भागीदार आहे. वाह...!  आता तू टीनेजर आहेस. ही गोष्ट मान्य करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. मी तुला हे सांगू शकत नाही की तुझी तल्लख बुद्धी, तुझा मस्करी करण्याचा अंदाज, तुझी ताकद, दयाळूपणा व मस्तीखोरपणा या सर्व गोष्टींसाठी मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिल्यांदाच मी तुझ्या वाढदिवसादिवशी सोबत नाही. तुझी खूप आठवण येते. तुला माझ्याकडून खूप सारे प्रेम.

काही दिवसांपूर्वी सोनालीचा मुलगा रणवीर उन्हाळी सुट्टींसाठी आईसोबत न्यूयॉर्कमध्ये गेला होता. त्यावेळी सोनालीने त्याच्यासोबतचे छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर केले होते. सोनालीने त्याच्यासोबतचा एक चांगला फोटो शेअर करून लिहिले होते की, सध्या माझा मुलगा रणवीरसोबत समर वेकेशन व्यतित करते आहे. त्याचा वेडेपणा व सकारात्मक विचार मला ताकद देत आहे.

सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे. सोनालीची तब्येत चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे. 

टॅग्स :सोनाली बेंद्रे