Join us

"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:25 IST

मृत्यूनंतर सुवासिनीसारखं सजून जाण्याची इच्छा स्मिता पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. आणि स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने अभिनेत्रीची ही शेवटची इच्छा पूर्णही केली होती. मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी स्मिता पाटील यांचा शेवटचा मेकअप केला होता.

स्मिता पाटील या सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री. आज इतक्या वर्षांनंतरही त्या चाहत्यांच्या मनात कायम आहेत. करिअरप्रमाणेच स्मिता पाटील या त्यांच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत होत्या. मृत्यूनंतर सुवासिनीसारखं सजून जाण्याची इच्छा त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. आणि स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने अभिनेत्रीची ही शेवटची इच्छा पूर्णही केली होती. मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी स्मिता पाटील यांचा शेवटचा मेकअप केला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रसंगाबद्दल सांगितलं. 

दीपक सावंत यांनी रील मीट्स रियल या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्मिता पाटील यांची शेवटची आठवण सांगितली. ते म्हणाले, "स्मिता पाटील नेहमी म्हणायच्या की मृत्यूनंतर मला सुवासिनीप्रमाणे सजवूनच घेऊन जा. मी त्यांना असं बोलू नका म्हणून ओरडायचो. त्यांच्या आईलाही त्या असंच बोलायच्या. त्यामुळे त्यांची आईही त्यांना ओरडायची. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांची बहीण शिकागोवरुन येणार होती. त्यामुळे तिला २-३ दिवस लागणार होती. त्यामुळे स्मिता पाटील यांचा मृतदेह बर्फावर ठेवण्यात आला होता आणि तो सुजला होता". 

पुढे ते म्हणाले, "स्मिता पाटील यांच्या आईने मला मेकअप किट दिली. अमिताभ बच्चन आणि इतर सेलिब्रिटी तिथेच बसलेले होते. त्यांनी मला सगळ्यांसमोरच मेकअप किट दिली आणि त्या म्हणाल्या की सुवासिनीसारखंच सजून जायची तिची शेवटची इच्छा होती. मला अश्रू अनावर झाले होते. त्यांचा मेकअप करताना माझे डोळे भरुन आले होते. स्मिता पाटील यांचा शेवटचा मेकअप मी केला आणि शेवटच्या दिवशीची त्या खूप सुंदर दिसत होत्या".  

टॅग्स :स्मिता पाटीलसेलिब्रिटी