Join us

तिकीट दाखवा अन् हृतिक रोशनला भेटा; ‘काबिल’च्या कमाईसाठी असाही फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 17:19 IST

कमाईच्या बाबतीत मात्र शाहरूख हृतिकवर वरचढ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता सिनेमाचे कलेक्शन वाढविण्यासाठी हृतिकने ‘तिकीट दाखवा अन् हृतिक रोशनला भेटा असा नवा फंडा शोधला आहे.

गेल्या विकेंडमध्ये रिलिज झालेल्या हृतिक रोशनचा ‘काबिल’ आणि शाहरूख खानचा ‘रईस’ सिनेमा बॉक्स आॅफिसवर एकत्र रिलिज झाल्याने दोघांमध्ये जबरदस्त फाइट रंगताना दिसत आहे. समीक्षकांकडून रईसच्या तुलनेत काबिलची प्रशंसा केली गेली असली तरी, कमाईच्या बाबतीत मात्र शाहरूख हृतिकवर वरचढ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता सिनेमाचे कलेक्शन वाढविण्यासाठी हृतिकने ‘तिकीट दाखवा अन् हृतिक रोशनला भेटा असा नवा फंडा शोधला आहे. प्रजासत्ताक दिनाचे निमित्त अन् याच दरम्यान अधिक सुट्ट्यांचा विकेण्ड असा विचार करून हृतिकचा काबिल अन् शाहरूखचा रइस रिलिज केला गेला. हृतिकच्या अभिनयावर भावून गेलेल्या समीक्षकांनी सिनेमाचे जबरदस्त कौतुक केले. त्यामुळे काबिलच्या तुलनेत रईस पिछाडीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र जेव्हा बॉक्स आॅफिसवरील कलेक्शनचे आकडे समोर आले तेव्हा रईसने काबिलला मात दिल्याचे स्पष्ट झाले. रईसने पहिल्या ७ दिवसांतच शंभर कोटींच्या क्लबमध्ये उडी घेतली. तर काबिल ९ दिवसांत फक्त ६७ कोटी रुपयांचा बिझनेस करू शकला. कलेक्शनचे आकडे बघून हैराण झालेल्या हृतिकला अन् त्याच्या टीमला मात्र हा धक्का होता. आता ही संपूर्ण टीम सिनेमाचे कलेक्शन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वेगवेगळे फंडेही शोधले जात आहेत. त्यातील एक प्रभावी फंडा म्हणजे ‘तिकीट दाखवा अन् हृतिकला भेटा’ हा होय. या फंड्यानुसार जो फॅन्स काबिलचे मुव्ही तिकीट दाखविणार त्याला हृतिकसह काबिलच्या संपूर्ण टीमला भेटण्याची संधी मिळणार आहे. हृतिकने गेल्या शुक्रवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करून या आगळ्यावेगळ्या प्रमोशनची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये हृतिक रोशन काबिलची सक्सेस पार्टी एकटा नव्हे तर त्याच्या ५०० फॅन्सबरोबर सेलिब्रेट करणार आहे. मात्र या सक्सेस पार्टीत सहभागी होण्यासाठी फॅन्सला त्यांच्याकडील काबिलचे तिकीट दाखवावे लागणार आहे. मात्र सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे तिकीट ३ फेब्रुवारी नंतरचे असायला हवे. हृतिकने त्याच्या या व्हिडीओमध्ये फॅन्सचे आभार व्यक्त करताना म्हटले की, काबिलचे यश तुमच्याशिवाय अर्धवट आहे. यामुळे मला असे वाटते की, तुम्ही सर्वांनीच या सिनेमाच्या सक्सेस पार्टीत सहभागी व्हायला हवे. आपण सर्व सिनेमाचे सक्सेस सेलिब्रेट करूयात.  व्हिडीओमध्ये पुढे बोलताना हृतिक म्हणाला की, ३ फेब्रुवारीनंतरच्या या तिकिटाबरोबरचा एक सेल्फी तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करावा लागणार आहे. त्याच्यासोबत काबिलचा हॅशटॅग शेअर करावा लागेल. आम्ही लकी ड्राद्वारे यातील ५०० फॅन्सची निवड करणार आहोत. निवड झालेल्या फॅन्सला मला, माझे पापा (राकेश रोशन), रोनित रॉय, रोहित रॉय आणि दिग्दर्शक संजय गुुप्ता यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.