गोविंदा स्टाईलने डान्स करत एका रात्रीत सुपरहिट झालेले डान्सिंग अंकल म्हणजेच संजीव श्रीवास्तव सोशल मीडियावर सक्रीय झाले आहेत. अनेकवेळा ते त्यांच्या डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. डान्समध्ये नशीब आजमाविल्यानंतर डान्सिंग अंकल आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. डान्सिंग अंकल आता एका लघुपटात दिसणार असून ‘कॉलेज अॅडमिशन अॅण्ड डॅड’ असे या शॉर्ट फिल्मचे नाव अाहे. त्यांनी या लघुपटाचा एक भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे.
डान्सिंग अंकलची डान्स स्टाईल पाहून त्यांना चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. यापैकी त्यांनी एका लघुपटासाठी होकार दिला आहे. या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण सुरु झाले असून ही फिल्म ११ मिनिटांची असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘कॉलेज अॅडमिशन अॅण्ड डॅड’ या लघुपटाची सुरुवात एका व्हॉईसओव्हरपासून होते. त्यानंतर संजीव यांची एन्ट्री होतांना दिसते. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्ममध्ये व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
एका लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडिओ वायरल झाल्यामुळे रातोरात लोकप्रिय झालेल्या डान्सिंग अंकलच्या डान्सचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये आणखीन वाढ झाली आहे. इतकेच नाही तर त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलालाही ऑफर मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी संजीव हे अभिनेता सुनील शेट्टी याला भेटण्यासाठी मुंबईला आले होते. त्यांना हेराफेरी 3 मध्ये ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. आता संजीव श्रीवास्तव हे सलमान खानसोबतही स्क्रिनवर झळकणार असल्याची चर्चा आहे. डान्सनंतर आता त्यांचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल का हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.