>> संदीप आडनाईक
दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा 'शोले' सिनेमा (Sholey Movie) १९७५ मध्ये भारतात प्रदर्शित झाला त्याला आज, १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. इतिहासात मैलाचा दगड बनलेला हा सिनेमा असंख्य वेळा पाहणाऱ्या कोल्हापुरातील चाहत्यांनी आणि तो सलग ६० आठवडे जेथे प्रदर्शित झाला, त्या चित्रपटगृहाच्या मालकांनी ‘शोले’च्या आठवणी ‘लोकमत’कडे ताज्या केल्या. दरम्यान, काढून टाकलेल्या दृश्यासह हा सिनेमा पुन्हा एकदा आज, युरोपात प्रदर्शित होत आहे.
कडवे बच्चन चाहते इसाक मुल्लाणीकेर्ले गावचे रहिवासी ५४ वर्षीय इसाक शाहबुद्दीन मुल्लाणी यांनी नाटककार, चित्रपटप्रेमी वडिलांसोबत चार वर्षांचे असताना ‘शोले’ पाहिला आणि नंतर अमिताभ बच्चन यांच्या अदाकारीने ते त्यांचे कडवे चाहते बनले. त्यांचे सगळे चित्रपट अनेकवेळा त्यांनी पाहिले. ‘शोले’ची तर त्यांनी चित्रपटगृहात ६८ वेळा पारायणे केली आहेत. तितक्याच वेळा त्यांची प्रत्यक्ष भेटही घेतली आहे. त्यांनी बच्चन यांच्या चित्रपटाच्या बातम्यांची कात्रणे आणि छायाचित्रांचा अल्बम तयार केला आणि १९८९ पासून त्यांना रोज दोन पत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवू लागले. अखेर १० ऑगस्ट १९९२ या दिवशी मुंबईत प्रतीक्षा बंगल्यावर बच्चन यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतरही दरवर्षी ते त्यांना भेटतात. इतकेच नव्हे, तर ग्रामीण भागात त्यांनी तयार केलेल्या बच्चनप्रेमींच्या ७८ जणांच्या ग्रुपशीही त्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली आहे.
सिनेमासाठी काहीही..बच्चनप्रेमी चिल्लर पार्टी चळवळीचे मिलिंद यादव यांनीही हा सिनेमा मित्रांसमवेत तब्बल २५ वेळा पाहिल्याची आठवण सांगितली. दुपारच्या शोसाठी चित्रपटगृहासमोर पहाटेपासून रांगा लावून त्यांनी तिकिटे मिळवणे ते फर्स्टची तिकिटे काढून स्टॉलमधून हा सिनेमा पाहिल्याची गंमतही त्यांनी सांगितली. बच्चन वेडे सुधर्म वाझे, हर्षला वेदक यांनीही या सिनेमाच्या आठवणी ताज्या केल्या. एस. एम. लोहिया शाळेसमोरील एका चाहत्याने तर दहावीच्या परीक्षेत ‘शोले’ची पटकथाच लिहिली होती.
महापुरात 'शोले'च्या ट्रॉफी झाल्या नष्टहा सिनेमा प्रथम जेथे प्रदर्शित झाला, त्या उषा चित्रपटगृहाचे मालक सचिन शाह यांनीही ‘शोले’च्या आठवणी ताज्या केल्या. १९७४ मध्ये नूतनीकरण झाल्यानंतर ‘शोले’ प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने येथे ६० आठवडे मुक्काम केला. रौप्य आणि सुवर्णमहोत्सव झाल्यानंतरच्या ट्रॉफी आणि अनेक छायाचित्रे त्यांच्याकडे होती; परंतु २०१९ मधील महापुरात ते नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.