Cricket to Bollywood: क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकार ठोकणारा, लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू आता सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. पण चित्रपटातून नाही, तर थेट म्युझिक व्हिडीओमधून. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. लवकरच चाहत्यांच्या भेटीला एक रोमँटिक गाणं येत आहे. ज्यामध्ये क्रिकेटचा 'गब्बर' बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळणार आहे.
सिनेसृष्टीत धमाकेदार एन्ट्री घेणारा भारताचा स्टार क्रिकेटपटू हा दुसरा तिसरा कुणी नाही तर शिखर धवन (Shikhar Dhawan ) हा आहे. शिखर धवन क्रिकेटच्या मैदानानंतर आता सिनेसृष्टी गाजवणार आहे. शिखर धवनच्या 'बेसोस' (Besos) या गाण्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात शिखर धवन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez ) रोमँटिक लूकमध्ये पाहायला मिळतोय. शिखर धवन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचं हे नवं Besos गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे.
शिखर धवनच्या रोमँटिक डेब्यूने चाहत्यांना सुखद धक्का मिळालाय. टीझर व्हिडीओवर शिखर धवनच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक या गाण्यासाठी उत्सुक आहेत. शिखर आणि जॅकलिन या दोघांची केमिस्ट्री पाहून हे गाणं यशस्वी ठरणार यात शंका नाही. याआधी शिखर धवन याने जाहिरातींमध्ये काम केलं आहे. पण, आता पहिल्यांदाचं म्युझिक व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहे.
शिखर धवनविषयी...
शिखर धवन हा शांत, संयमी आणि निर्भय खेळीसाठी ओळखला जातो. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या शिखर धवन याने २०१० मध्ये आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर २४ ऑगस्ट २०२४ रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो शेवटच्या वेळी डिसेंबर २०२२ मध्ये टीम इंडियातून खेळला होता. बांगलादेशविरूद्धचा वन डे सामना धवनच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलग दोन वेळा गोल्डन बॅट जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.