बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानला त्याच्या बहुचर्चित 'जवान' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या प्रतिष्ठित पुरस्काराने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, पण या पुरस्कारासोबत मिळणाऱ्या रोख बक्षिसाच्या रकमेने मात्र अनेकांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याला नेमकी किती रक्कम मिळते हा प्रश्न सर्वांच्या मनात होता. अखेर याचा खुलासा झाला आहे
शाहरुखला प्राईज मनी म्हणून मिळाले फक्त...
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी २ लाख रुपये दिले जातात. तसंच राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या नियमांनुसार, जेव्हा एखादा पुरस्कार दोन कलाकारांमध्ये विभागला जातो, तेव्हा रोख रक्कमही समान वाटून दिली जाते. त्यामुळेच शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी आणि '१२th फेल' या लोकप्रिय चित्रपटासाठी अभिनेता विक्रांत मेस्सीला संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे, दोन्ही कलाकारांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळाले.
शाहरुखला कारकीर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत काल (२३ सप्टेंबर) दिल्लीत ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला प्रदान करण्यात आला. तब्बल ३३ वर्षांच्या करिअरनंतर शाहरुख खानने राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी या खास क्षणी उपस्थित होती. याशिवाय अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता विक्रांत मेस्सी सुद्धा शाहरुखसोबत सन्मान घेण्यासाठी उपस्थित होते.