सलमान खानचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. या सिनेमांनी प्रेक्षकांचंही प्रेम मिळवलं. सलमान खानचा असाच एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'तेरे नाम'. २००३ साली आलेला 'तेरे नाम' हा सिनेमा तुफान गाजला आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा सिनेमा आजही लोकांच्या मनात खास स्थान टिकवून आहे. या सिनेमाची कथा, गाणी अशा सर्वच गोष्टींची चर्चा झाली. पण जास्त चर्चा झाली ती म्हणजे सिनेमातील सलमानच्या हेअरस्टाईलची. ही गाजलेली हेअरस्टाईल एका राजकीय व्यक्तीच्या हेअरस्टाईलवर आधारीत होती, असा खुलासा सलमानने केला.
सलमानच्या हेअरस्टाईलचं रहस्य
सलमान अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याने हा खुलासा केला. सलमान म्हणाला, "तेरे नाम' चित्रपटातील राधेची हेअरस्टाईल भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरित होती. 'तेरे नाम'चा हा लूक प्रत्यक्षात अब्दुल कलाम साहेबांपासून प्रेरित होता आणि मला वाटते की, अभिनेता राहुल रॉयचीही अशीच हेअरस्टाईल होती. एका छोट्या शहरातील नायकाचे केस नेहमीच लांब असतात. जुन्या काळातील सर्व नायकांचे केस लांब असायचे, त्यामुळे ही हेअस्टाईल त्यांच्यापासूनच प्रेरित झाली."
अशाप्रकारे सलमानने २२ वर्षांनी 'तेरे नाम'च्या हेअरस्टाईलचा खुलासा केला. सलमानने हा खुलासा करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. सलमानचा 'तेरे नाम' नाम हा सिनेमा २००३ साली रिलीज झाला होता. हा सिनेमा सतीश कौशीक यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात सलमानसोबत भूमिका चावला, सचिन खेडेकर, सविता प्रभुणे, रवी किशन यांनी भूमिका साकारली होती. सलमानच्या सुपरहिट सिनेमांच्या रांगेत 'तेरे नाम'चं नाव अग्रक्रमाने घेता येतं.