Join us

"फिल्म इंडस्ट्री विभागली गेली आहे", संजय दत्तने व्यक्त केली खंत; म्हणाला, "दु:ख होतं की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:27 IST

संजय दत्तचा 'द भूतनी' हा सिनेमा येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्याने इंडस्ट्रीवर भाष्य केलं.

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त (Sanjay Dutt) बऱ्याच काळापासून गायब आहे. काही वर्षांपासून त्याचा एकही सिनेमा म्हणावा तसा हिट झालेला नाही. सलमान खान, अक्षय कुमारसारख्या मोठ्या स्टार्सचे सिनेमेही सध्या सुपरफ्लॉप होत आहेत. लवकरच संजय दत्त सलमान खानसोबत सिनेमात दिसणार आहे. शिवाय त्याचा आता 'द भूतनी' हा सिनेमाही येत आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनवेळी संजय दत्तने इंडस्ट्रीवर भाष्य केलं.

'द भूतनी'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये संजय दत्त म्हणाला, "आपली फिल्म इंडस्ट्री आता विभागली गेली आहे याचं दु:ख होतं. असं कधीच बघितलं नव्हतं. सगळे एक कुटुंबासारखे होतो आणि नेहमीच राहू. सध्या सगळेच जरा भटकले आहेत. मला वाटतं की इंडस्ट्रीसाठी प्रत्येक सिनेमा महत्वाचा असतो. त्यामुळे प्रत्येक सिनेमाला ती संधी दिली पाहिजे. फिल्म डिस्ट्रिब्युटर, प्रमोटरने भेदभाव न करता प्रत्येक सिनेमाला समान वागणूक दिली पाहिजे."

तो पुढे म्हणाला, "भूतनी सिनेमाला इतकी प्रसिद्ध मिळत नाहीये. पण मला माहित आहे की सिनेमा खूप पुढे जाईल. मी विनंती करतो की इंडस्ट्रीने एकजूट व्हायला हवं आणि एकमेकांची मदत करायला हवी. जेणेकरुन फिल्म इंडस्ट्रीचा विकास होईल. मी फक्त माझंच सांगत नाहीये तर संपूर्ण कम्युनिटीसाठी बोलत आहे. माझं माझ्या इंडस्ट्रीवर प्रेम आहे."

संजय दत्तचा सिनेमा 'द भूतनी' हॉरर ड्रामा आहे. यामध्ये मौनी रॉय, पलक तिवारी, सनी सिंह यांचीही भूमिका आहे. सिद्धांत सचदेव यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.उद्या १ मे रोजी सिनेमा रिलीज होत आहे.

टॅग्स :संजय दत्तबॉलिवूड