अभिनेता सलमान खान (Salman Khan) आगामी सिनेमाच सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. गलवान घाटीत झालेल्या भारत विरुद्ध चीन युद्धावर हा सिनेमा आधारित आहे. सलमान खानचे गेले काही सिनेमे बॉक्सऑफिसवर अक्षरश: आपटलेत. नुकताच 'सिकंदर'आला ज्याच्याकडून खूप अपेक्षा होती मात्र तोही चालला नाही. आता सलमान आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. यासाठी त्याने कमालीचं वजन घटवलं आहे. दरम्यान सिनेमात सलमानची मुख्य अभिनेत्री कोण असणार हेही आता समोर आलं आहे.
गलवान घाटी वॉर ड्रामावर आधारित हा सिनेमा आहे. सलमान खान मुख्य भूमिकेत असून भारतीय सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. इंडिया टु़डेच्या रिपोर्टनुसार, या सिनेमात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंह (Chitrangada Singh) दिसणार आहे. सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. याआधी चित्रांगदाने अक्षय कुमारसोबत 'देसी बॉइज','खेल खेल मे' हे सिनेमे केले. आता तिला थेट सलमानसोबत झळकण्याची संधी मिळाली आहे.
चित्रांगदा सिंह तिच्या 'आओ राजा' या आयटम साँगमधूनही लोकप्रिय झाली होती. 'गब्बर इज बॅक' सिनेमातलं हे आयटम साँग होतं. तिने सुधीर मिश्रा यांच्या 'हजारो ख्वाहिशे ऐसी' सिनेमातील भूमिकेमुळेही ओळख मिळाली होती. 'बावरा मन देखने चला एक सपना' हे लोकप्रिय गाणं तिच्यावरच चित्रित करण्यात आलं होतं.
सिनेमाविषयी
२०२० साली गलवान घाटीत भारतीय सैन्याचा चीनी सैन्यासोबत मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये १६ बिहार रेजिमेंटने नेतृत्व केलं होतं. सिनेमात सलमान खान कर्नल बी. संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिव अरुर आणि राहुल सिंह लिखित 'इंडियाज मोस्ट फियरलेस 3' कादंबरीवर सिनेमा आधारित आहे. 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' फेम अपूर्व लखिया सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.