बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सलमानचे वडील आणि दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलांच्या या कठीण काळात त्यांच्या जवळ राहता यावे, यासाठी सलमानने त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गालवान' (Battle of Galwan) या चित्रपटाच्या शूटिंगचे ठिकाण तातडीने बदलले आहे.
'बॅटल ऑफ गालवान' या चित्रपटाचे चित्रीकरण शहराबाहेर किंवा लांबच्या लोकेशनवर होणार होते. मात्र, सलीम खान रुग्णालयात असल्याने सलमानला वारंवार त्यांची भेट घेणे आणि त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे निर्मात्यांशी चर्चा करून सलमानने शूटिंगचे वेळापत्रक बदलले असून, आता या चित्रपटाच्या महत्त्वाचा भाग वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओत चित्रित केला जाणार आहे. यामुळे सलमानला शूटिंगच्या मधल्या वेळातही वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात जाणे सोपे होणार आहे.
८९ वर्षीय सलीम खान यांना वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या काही त्रासामुळे मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. सलमानसह अरबाज आणि सोहेल खान देखील सतत वडिलांच्या संपर्कात आहेत.
चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता
'बॅटल ऑफ गालवान' हा चित्रपट भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटात सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाही सलमानने वडिलांच्या प्रकृतीला प्राधान्य दिल्याने चाहत्यांकडून त्याचे कौतुक होत आहे. सलीम खान लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. सलमान खानच्या या निर्णयामुळे शूटिंगमध्ये थोडा बदल झाला असला तरी, कामात कोणताही खंड पडू नये आणि वडिलांनाही वेळ देता यावा, असा उद्देश यामागे असल्याचे बोलले जात आहे.
Web Summary : Salim Khan's ill health prompted Salman Khan to shift the 'Battle of Galwan' shoot to Mumbai. This allows Salman to visit his father in the hospital frequently. Fans are praising Salman's dedication to his family during this difficult time.
Web Summary : सलीम खान की बीमारी के कारण सलमान खान ने 'बैटल ऑफ गलवान' की शूटिंग मुंबई में स्थानांतरित कर दी। इससे सलमान को अस्पताल में अपने पिता से बार-बार मिलने की सुविधा होगी। इस मुश्किल समय में प्रशंसक सलमान के परिवार के प्रति समर्पण की सराहना कर रहे हैं।