'भाभीजी घर पर हैं' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता आसिफ शेख यांनी एका मुलाखतीत सलमान खानबद्दल असा खुलासा केलाय ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आसिफ शेख आणि सलमानचे जुने संबंध आहेत. सलमानचे कुटुंबीय अर्थात त्याचे वडील सलीम खान आणि भाईजानचा मेव्हणा अतुल अग्निहोत्रीसोबत आसिफ शेखचं मैत्रीपूर्ण नातं आहे. अशातच आसिफने सलमानबद्दल असं विधान केलंय, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आसिफ शेख सलमानबद्दल काय म्हणाले?
आसिफ शेख यांच्या म्हणण्यानुसार, ते आणि सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्री हे चांगले मित्र आहेत. आसिफ अनेकदा सलमानच्या फार्महाऊसवर सलीम खान यांना भेटायला जात असत. सलीम खान हे एक समजूतदार आणि अनुभवी व्यक्ती आहेत. याशिवाय सलीम यांच्याकडे विनोदाची उत्तम जाण आहे. ते बॉलिवूडचे अनेक किस्से रंगवून सांगतात, असं आसिफ शेख म्हणाले.
आसिफ यांनी खुलासा केला की, ''सलमान आपल्या वडिलांचा खूप आदर करतो. सलीम खान आपल्या मुलाचे सर्वात मोठे टीकाकार आहेत आणि ते कधीही गोड बोलत नाहीत, उलट थेट तोंडावर बोलतात.'' आसिफ यांनी एक आठवण सांगितली की, ''जेव्हा सलमान एक नवीन स्टार होता, तेव्हा तो आपल्या वडिलांच्या समोर घाबरून असायचा. याशिवाय सलीम खान हे मोठं व्यक्तिमत्व असल्याने, वडिलांसमोर बोलण्याचं धाडस सलमानला नव्हतं. सलमान वडिलांचा खूप आदर करायचा'', असं आसिफने सांगितलं आहे.