Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेशच्या पहिल्या सिनेमाच्या सेटवर आल्या होत्या सुषमा स्वराज, रितेशने जागवल्या या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 14:33 IST

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.  त्यांना शेवटचा निरोप देताना देशाच्या प्रत्येक व्यक्तिचे डोळे पाणावले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ही त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. सुभाष घई, रवीना टंडन, बोमन इराणी आणि रितेश देशमुख यांनी भावूक ट्विट करत आदरांजली वाहिली आहे. रितेश देशमुख श्रद्धांजली देताना एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने सुषमा स्वराज यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.   

रितेश ट्विट करताना लिहिले आहे की, ‘२००१ मध्ये माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीचा योग आला होता. त्यावेळी त्या रामोजी फिल्मसिटीमध्ये आल्या होत्या.  तिथे माझ्या आणि जेनिलियाचा पहिला सिनेमा 'तुझे मेरी कसम'चे शूटिंग  सुरु होते त्यावेळी त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता. त्यावेळी मी इंडस्ट्रीत नवीन होतो. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं होतं. धन्यवाद सुषमा स्वराज मॅडम अशा शब्दात रितेशने आदरांजली वाहिली आहे.   

1988 मध्ये सुषमा स्वराज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री होत्या. या काळात त्यांनी बॉलिवूडच्या फिल्म प्रॉडक्शन ते फिल्म इंडस्ट्री बनण्यापर्यंतच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुषमा स्वराज यांनी सिनेमाला उद्योगाचा दर्जा प्रदान केला. यामुळे भारतीत फिल्म उद्योगाला बँकेकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. 

नेतृत्व क्षमतेच्या जोरावर सुषमा स्वराज यांच्याकडे भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील सर्वात वजनदार नेत्या म्हणून पाहिलं जात होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विदिशातून विजय मिळवला होता. त्यांची पत आणि भाजपासाठी दिलेलं योगदान लक्षात घेता मोदींनी त्यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं सोपवलं. इंदिरा गांधींनंतर सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला परराष्ट्र मंत्री झाल्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयातही आपला वेगळा ठसा उमटवला.   

टॅग्स :सुषमा स्वराजरितेश देशमुख