Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर शेवटपर्यंत भेटू शकले नाहीत या व्यक्तीला, अनेक वर्षं घेत होते त्याचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:36 IST

ऋषी कपूर अनेक वर्षं त्यांच्या एका मित्राला शोधत होते. पण शेवटपर्यंत या मित्रासोबत त्यांची भेट झाली नाही.

ठळक मुद्दे‘कर्ज’मध्ये राज किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते. तेव्हापासूनच त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती. त्यांनीही राज किरण यांना शोधण्याचे  अनेक प्रयत्न केले होते.

ऋषी कपूर यांनी एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केले होते. ३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्याआधी दोन वर्षं अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. २०१९ च्या नोव्हेंबरमध्ये ते भारतात परतले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाचा त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले होते.

ऋषी कपूर हे केवळ चांगले अभिनेते नव्हते तर ते एक चांगले माणूस देखील होते. ते अनेक वर्षं त्यांच्या एका मित्राला शोधत होते. पण शेवटपर्यंत या मित्रासोबत त्यांची भेट झाली नाही. त्यांच्या या मित्राला भेटण्याची त्यांची इच्छा कायम अपूर्ण राहिली. 80 च्या दशकात मोठा पडदा गाजवणारा राज किरण हा अभिनेता ऋषी कपूर यांचा खूप चांगला मित्र होता. पण अचानक तो गायब झाला. तो कुठे आहे, कुठल्या स्थितीत आहे, याची दखलही सुरुवातीला कुणी घेतली नाही. दशकभरानंतर काहींना जाग आली. यानंतर अनेकांनी राज किरण यांचा शोध सुरू केला. या काळात कधी त्यांच्या मृत्यूची अफवा उडाली. काहींनी ते मनोरूग्णालयात असल्याचे म्हटले तर काहींनी ते न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवत असल्याचा दावा केला. पण राज किरण कधीच परतले नाहीत.

‘कर्ज’मध्ये राज किरण यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले होते. तेव्हापासूनच त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती. त्यांनीही राज किरण यांना शोधण्याचे  अनेक प्रयत्न केले होते. 2011 मध्ये ऋषी कपूर राज किरण यांचा भाऊ गोविंद मेहतानी यांना भेटले होते. राज किरण अमेरिकेत अटलांटाच्या एका मनोरूग्णालयात असल्याची माहिती गोविंद यांनी ऋषी कपूर यांना दिली होती. त्यानंतर देखील ऋषी कपूर यांनी राज किरण यांना भेटण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण शेवटपर्यंत त्या दोघांची भेट काही होऊ शकली नाही.

टॅग्स :ऋषी कपूर