Raveena Tandon: दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक पावले उचलली आहेत. न्यायालयाने सर्व भटके कुत्रे पकडून विशेष आश्रयस्थानांमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला या प्रक्रियेत अडथळा आणू दिला जाणार नाही. जर कोणी असे केले तर त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल. यासोबतच, दिल्लीतील नागरिकांसाठी भटक्या कुत्र्यांविषयी तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयानंतर प्राण्यांवर प्रेम करणारे अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री रवीना टंडनने या विषयावर आपले मत मांडले. एचटी सिटीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली,"भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येसाठी या गरीब प्राण्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. जर स्थानिक संस्थांनी लसीकरण आणि नसबंदी मोहिमा योग्य रितीने राबवल्या असत्या, तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. स्थानिक संस्थांनी त्यांच्या क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची जबाबदारी घ्यावी आणि नसबंदी ही आजची सर्वात मोठी गरज आहे". रवीना टंडनच्या मताशी अनेक प्राणीमित्रांनी सहमती दर्शवली आहे.
रवीना टंडनचा वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'वेलकम टू द जंगल' या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, संजय दत्त यांसारखे अनेक कलाकार आहेत. सुरुवातीला हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता, मात्र सध्या त्याबाबत कोणतीही अपडेट आलेलं नाही. या चित्रपटात बऱ्याच वर्षानंतर रवीना आणि अक्षय एका चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.