Join us

रवीना टंडन पोहोचली अयोध्येत, रामलल्ला आणि हनुमान गढी मंदिरात घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:05 IST

रवीना टंडनने घेतले रामलल्लाचे दर्शन, म्हणाली...

Raveen Tandon in Ayodhya: अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य राम मंदिर सर्वांसाठी खुले झाले आणि केवळ देशात नाही, तर जगात जल्लोष झाला. राजस, सुकुमार अशा रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी अयोध्येत होते. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने गुरुवारी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर हनुमान गढी मंदिरात नतमस्तक झाली. यावेळी तिच्यासोबत उपस्थित असलेल्या भाविकांनी 'जय श्री राम'चा जयघोष केला.

रवीनाने सुमारे ४० मिनिटे अयोध्येत घालवली.  रवीनानं मंदिराच्या गर्भगृहात विधीपूर्वक पूजा केली आणि काही काळ ध्यानही केलं. गर्भगृहातून बाहेर पडल्यावर हा क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याचे तिने सांगितले. रवीना म्हणाली, "अयोध्येच्या या पवित्र भूमीवर पाऊल ठेवताच माझे मन आपोआप श्रद्धेने भरून गेले. राम मंदिरात आल्यावर असे वाटते की जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आहे. या अद्भुत मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते".

रवीना म्हणाली, "आज माझे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले आहे. रामलल्लाच्या या भव्य आणि दिव्य मंदिराला भेट दिल्यावर मला खूप आध्यात्मिक शांती मिळाली आहे". यावेळी रवीनाने पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. ती म्हणाली, "त्यांनी आमच्यासाठी रामजींच्या जन्मस्थळाला भेट देण्याची इतकी अद्भुत व्यवस्था केली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे".

राम मंदिराच्या उद्घाटनानंतर सेलिब्रिटींची रीघराम मंदिराच्या उद्घाटनानंतर देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अयोध्येला भेट देत आहेत. सेलिब्रिटी, उद्योगपती आणि राजकारणी यांनी आतापर्यंत रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. याच क्रमाने आता रवीना टंडननेही दर्शन घेतले आहे. रवीना टंडन धार्मिक कार्यांमध्ये नेहमीच सक्रिय असते. सहा महिन्यांपूर्वी महाशिवरात्रीला ती वाराणसीला गेली होती. तसेच, या वर्षीच्या महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजमध्ये तिने आपल्या मुलीसोबत गंगा स्नान केले होते.

टॅग्स :रवीना टंडनबॉलिवूडसेलिब्रिटीअयोध्या