Join us  

'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 1:54 PM

आजकाल काम मिळवण्यासाठी भलत्याच गोष्टी बघितल्या जातात.

रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) हिंदी कलाविश्वातील प्रतिभावान अभिनेत्री आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांना कामच मिळालं नाही असा खुलासा त्यांनी नुकताच केला. तसंच यामागचं कारणही सांगितलं. यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी आपण वर्षभरापासून बेरोजगार असल्याचं सांगितलं. आजकाल कलाकारांच्या टॅलेंटपेक्षा त्यांच्या लूक्सला जास्त प्राधान्य दिलं जातं. 

ब्रुटला दिलेल्या मुलाखतीत रत्ना पाठक शाह म्हणाल्या, "मला काम मिळालं नाही याचं कारण मी इन्स्टाग्रामवर नाही हे असू शकतं. याला कलाकार जबाबदार नाहीत. कारण आजकाल याच गोष्टी बघितल्या जातात. जगाचं आजकाल याचकडे लक्ष असतं. तुमचे इन्स्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत हे बघून तुम्हाला काम दिलं जातं असं मी ऐकलं आहे. मी इन्स्टाग्रामवर नाही त्यामुळे मला कोणीच विचारलं नाही असंही होऊ शकतं. मी वर्षभरापासून बेरोजगार आहे. या अशा काही गोष्टींवर सध्या लक्ष देण्याची खूप गरज आहे."

रत्ना पाठक शाह या शेवटच्या 'धकधक' सिनेमात दिसल्या. यामध्ये दिया मिर्झा, संजना सांघी आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सिनेमा रिलीज झाला. रत्ना पाठक शाह या नेहमीच त्यांच्या सामाजिक विषयावरील बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात.

दोन दिवसांपूर्वीच रत्ना पाठक शाह यांनी कान्समध्ये हजेरी लावली होती. श्याम बेनेगल यांच्या 1976 साली रिलीज झालेल्या 'मंथन' सिनेमाचं कान्समध्ये स्पेशल स्क्रीनिंग पार पडलं. यासाठी रत्ना पाठक यांनी नसीरुद्दीन शाह, प्रतीक बब्बरसोबत हजेरी लावली.

टॅग्स :सेलिब्रिटीसोशल मीडियाबॉलिवूड