अभिनेत्री रश्मिका मंदाना ही 'पुष्पा २', 'छावा', 'कुबेरा' अशा विविध सिनेमांमुळे सध्या चर्चेत आहे. रश्मिका विविध भूमिका करुन प्रेक्षकांचं मन जिंकतेय. रश्मिकाने सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या ८ तासांच्या कामाची शिफ्ट यावर तिचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने आगामी ८ तासांपेक्षा जास्त काम करण्यास नकार दिल्याने संदीप रेड्डी वांगाच्या सिनेमातून तिला डच्चू देण्यात आला. याच प्रकरणावर रश्मिकाने विरोध करुन संदीप वांगाची बाजू घेतली आहे.
रश्मिका ८ तासांच्या शिफ्टबद्दल काय म्हणाली?
मोजो स्टोरीला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका या वादाबद्दल म्हणाली, “साऊथ चित्रपटसृष्टीत कामाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ६ अशी ठरलेली असते. पण हिंदी चित्रपटसृष्टीत १२ तासांची शिफ्ट म्हणजे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत काम केलं जातं. कधी कधी तर २४-३६ तास सलग शूटिंग चालतं. काही वेळा २-३ दिवस घरी न जाता सतत काम करावं लागतं. मी या दोन्ही शिफ्टमध्ये काम करायला तयार आहे. कारण ती माझ्या सिनेमाची गरज आहे."
रश्मिका पुढे म्हणाली, “कामाचे तास काय असावेत, हे कलाकार आणि टीम यांच्यात आपापसात बोलून ठरवायला हवं. जर एखाद्या कलाकाराला विशिष्ट वेळेतच काम करायचं असेल, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे.” रश्मिकाच्या मते, प्रत्येक प्रोजेक्टची गरज वेगळी असते. त्यामुळे कामाची वेळ ठरवताना सर्वांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घ्यावा. ही बाब जबरदस्तीने कोणावर लादू नये, असं तिनं स्पष्टपणे सांगितलं. अशाप्रकारे रश्मिकाने दीपिका पादुकोण-संदीप वांगा यांच्या ८ तासांच्या शिफ्टच्या प्रकरणावर तिचं मत व्यक्त केलंय. एकूणच सिनेमासाठी कितीही वेळ काम करायला रश्मिका तयार आहे, असं ती म्हणाली.