अभिनेता रणवीर सिंहने (Ranveer Singh) 'बँड बाजा बारात'मधून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यशराज फिल्म्सने त्याला लाँच केलं. रणवीरने यशराजसोबत चार सिनेमे केले. 'बँड बाजा बारात', 'लेडीज व्हर्सेस रिकी बहल','बेफिक्रे' आणि 'जयेशभाई जोरदार' हे ते सिनेमे होते. यशराज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने (Shanoo Sharma) रणवीर सिंहला शोधून काढलं होतं. इतकी वर्ष यशराजसोबत काम केल्यानंतर आता रणवीरने प्रोडक्शन हाऊस सोडल्याची चर्चा होती. यावर नुकतंच शानू शर्माने भाष्य केलं आहे.
'द हॉलिवूड रिपोर्टर ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत शानू शर्मा म्हणाली, "त्याने प्रोडक्शन हाऊस सोडलं याचं मला अजिबात वाईट वाटत नाही. तो त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे. मी त्याला शुभेच्छा देते. तो बाहेर पडण्याचं नक्कीच काहीतरी कारण असेल. तो गेल्यामुळे प्रोडक्शन हाऊसलाही काही अडचण नाही यामागेही काही कारण असेल. गोष्टी घडतात मग बिघडतात मग पुन्हा घडतात. हे इतकं साधं आहे. रणवीरला पुढे जायचं होतं तो गेला. माझ्यासाठी तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे आमच्यात मनात रणवीरबद्दल काहीच कडवटपणा नाहीये."
ती पुढे म्हणाली, "हा एक बिझनेस आहे. आम्ही जर कोणाला लाँच करतोय तर त्याच्यावर आम्ही पूर्ण मेहनत घेतो. काही वेळा गोष्टी सुरळीत होतात काही वेळेला होत नाहीत. पण मी त्यांच्यासाठी कायम उपलब्ध आहे. अगदी त्यांनी प्रोडक्शन हाऊस सोडलं तरी मी त्यांच्यासाठी कधीही उभी आहे. मला आजही अनेक जण फोन करुन सांगतात की अमुक अमुक सिनेमासाठी कास्टिंग सुरु आहे. माझ्यासाठी बोलशील का? मी अशा वेळी मध्ये पडून त्या त्या कास्टिंग डायरेक्टरशी बोलते. अगदी माझं जर त्या कास्टिंग डायरेक्टरशी पटत नसेल तरी मी बोलते."