Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नवऱ्याने आवाज वाढवला, तर बायकोनेही..." राणी मुखर्जीने मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:51 IST

राणीने एका मुलाखतीत घरातील वातावरण आणि मुलांच्या मानसिकतेवर वडिलांचा कसा प्रभाव पडतो, यावर भाष्य केले.

बॉलिवूडची 'राणी' अशी ओळख असलेली अभिनेत्री राणी मुखर्जी आज तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या सुंदर आवाजामुळेच लाखो हृदयांवर राज्य करते. राणी सध्या तिच्या 'मर्दानी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मर्दानी ३' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राणीने 'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत घरातील वातावरण आणि मुलांच्या मानसिकतेवर वडिलांचा कसा प्रभाव पडतो, यावर भाष्य केले.

मुलांवर होणाऱ्या संस्कारांबाबत बोलताना राणी म्हणाली की, "स्त्रियांचा सन्मान करण्याची सुरुवात ही घरातूनच व्हायला हवी. जेव्हा एखादा पुरुष आपल्या पत्नीला किंवा आईला चुकीची वागणूक देतो, तेव्हा घरातली मुलं तेच बघून मोठी होतात. त्यांना असं वाटू लागतं की बाहेरच्या स्त्रियांनाही अशीच वागणूक मिळायला हवी. त्यामुळे आपल्या पत्नीला सन्मान देण्याची सर्व जबाबदारी ही वडिलांची आहे, कारण मुलं त्यांचंच अनुकरण करतात".

राणीने यावेळी स्त्रियांनाही स्वतःच्या हक्कासाठी उभं राहण्याचा सल्ला दिला. ती म्हणाली, "जर नवरा पत्नीवर विनाकारण आवाज वाढवत असेल, तर पत्नीनेही गप्प न बसता आपला आवाज वाढवला पाहिजे. स्त्रियांचा सन्मान घरापासूनच जपला गेला पाहिजे".

शाळेत मुलाला मारली होती कानशिलात!आपल्या लहानपणीचा एक मजेशीर पण तितकाच धाडसी किस्सा सांगताना राणी म्हणाली, "मी शाळेत असताना एका मुलाला कानशिलात मारली होती. त्यानंतर मात्र सर्व मुलं माझे चांगले मित्र झाले". मुलाखतीच्या शेवटी मिश्किलपणे हसत राणी म्हणाली, "आता हे विचारायला माझ्या नवऱ्याकडे (आदित्य चोप्रा) जाऊ नका की घरी काय होतंय!".

टॅग्स :राणी मुखर्जी