'रामायण' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. रणबीर कपूर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. 'रामायण' सिनेमा दोन भागांमध्ये बनवला जाणार आहे. अशातच 'रामायण' सिनेमाच्या पहिल्या भागाचं शूटिंग काहीच दिवसांपूर्वी संपलं. रणबीर कपूर या सिनेमात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासाठी रणबीर कसून मेहनत करताना दिसतोय. 'रामायण' सिनेमातील रणबीरची सह कलाकार इंदिरा कृष्णन यांनी याविषयी खुलासा केलाय.
'रामायण' सिनेमासाठी रणबीरची मेहनत
तब्बल ४००० कोटींच्या बजेटमध्ये 'रामायण' सिनेमा बनत आहे. या सिनेमासाठी रणबीर चांगलीच तयारी करत आहे. सुरुवातीला रणबीर त्याच्या भाषेवर काम करत आहे. केवळ शारीरिक बदल नाही तर वागण्या-बोलण्यातही बदल केला आहे. रणबीर या सिनेमासाठी श्रीरामांच्या प्रतिमेला जिवंत करण्यासाठी खूप मेहनत घेतोय. याशिवाय स्वतःचे खांदे सुदृढ करण्यासाठी परिश्रम घेताना दिसतोय. त्यासाठी रणबीर दररोज ३-४ तास मेहनत घेतोय. सेटवर तो कायम वेळेत येतो. पॅकअप झाल्यानंतरही रणबीर व्यायाम करणं विसरत नाही, असं इंदिरा कृष्णन म्हणाल्या.
"मला शूटिंगचा पहिला दिवस लक्षात आहे. आम्ही चंदन विधीचं शूटिंग करत होतो. त्यावेळी रणबीर ज्या पद्धतीने बसला होता तेव्हा आम्ही सर्वांनी अशी कल्पना केली की, स्वतः भगवान श्रीरामही असेच बसले असतील. रणबीरने शरीराचा वरील भाग, चेहरा, डोळे या गोष्टींना ज्या पद्धतीने सर्वांसमोर ठेवलं ते खूप कठीण काम आहे."
"रणबीर फक्त धोतर नेसून या सीनचं शूटिंग करत होता. परंतु तरीही ज्या प्रकारची सहजता त्याने अभिनयात दर्शवली त्याला तोड नाही. 'रामायण' सिनेमाचा हाच प्लस पॉईंट आहे. अॅनिमलमधला रणबीर आणि रामायणमधला रणबीर यात बरंच अंतर आहे." असा खुलासा इंदिरा कृष्णन यांनी केलाय. इंदिरा या सिनेमात श्रीरामांची आई कौशल्या मातेची भूमिका साकारणार आहेत.