Rajkummar Rao: पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी ठिकाणांवर टार्गेट हल्ला केला होता. या हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असं नाव देण्यात आलं. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. हेच नाही तर युद्धाची परिस्थिती निर्माण झालीये. या दरम्यान हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांना मॉक ड्रिलचं प्रशिक्षण दिलं जातंय. देशातील ही परिस्थिती पाहता "देश प्रथम" हे तत्व पाळत अभिनेता राजकुमारच्या 'भूल चूक माफ' (Bhool Chuk Maaf) चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे अभिनेता आणि चित्रपटाच्या संपुर्ण टीमचं कौतुक होतं आहे.
राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'भूल चूक माफ' हा कौटुंबिक मनोरंजनपर चित्रपट ९ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. यासाठी अॅडव्हान्स बुकिंगही सुरू करण्यात आली होती. मात्र, देशातील सध्याच्या सुरक्षा स्थितीचा विचार करून हा चित्रपट थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
मॅडॉक फिल्म्स आणि अमेझॉन MGM स्टुडिओज यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, "देशातील सद्यस्थिती आणि वाढती सुरक्षा काळजी लक्षात घेऊन 'भूल चूक माफ' चित्रपटाटा १६ मे रोजी Prime Video वर वर्ल्डवाइड प्रीमियर करण्यात येईल. आम्हाला थिएटरमध्ये प्रेक्षकांसोबत हा अनुभव शेअर करायची अपेक्षा होती, पण राष्ट्र प्रथम ही भावना सर्वोच्च आहे", असं म्हटलं. या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलंय.
टाइम लूप्सवर आधारित या सिनेमाचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केलं असून दिनेश विजन यांची निर्मिती आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. राजकुमार रावचा शेवटचा चित्रपट ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ फ्लॉप झाला होता. परंतु आता हा नवा चित्रपट काय चमत्कार करतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.