Join us

ना महागडा सेट ना लोकेशन! एकाच इमारतीत शूट झाला संपूर्ण सिनेमा; बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 12:57 IST

Bollywood movie: या सिनेमासाठी राजकुमार रावला ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं होतं.

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) एखाद्या सिनेमात काम करतांना  स्वत:ला झोकून देतो. त्यामुळेच त्याचे सिनेमा कायम प्रेक्षकांच्या मनाला भिडतात आणि ते सुपरहिट होतात. सध्या राजकुमारच्या अशाच एका सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमासाठी कोणताही महागडा सेट, वेगवेगळे लोकेशन्स वा कोणताही डामडौल करण्यात आला नव्हता. मात्र, तरीदेखील लो बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने ३० कोटींची कमाई केली होती. इतकंच नाही तर या सिनेमासाठी राजकुमारला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.

२०१७ साली रिलीज झालेला राजकुमारचा 'ट्रप्ट' (trapped)  हा सिनेमा बऱ्याच जणांच्या लक्षात असेल. ५ कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली होती. विशेष म्हणजे हा सगळा सिनेमा चक्क एकाच इमारतीमध्ये शूट झाला होता.

विक्रमादित्य मोटवाने यांची निर्मिती असलेल्या या सिनेमामध्ये राजकुमार रावने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारली होती. जो अन्नपाणी आणि लाईटशिवाय त्याच्या अपार्टमेंटमध्ये अडकतो. या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी तो जो खटाटोप करतो तो या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमाचं चित्रीकरण मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये झालं होतं. विशेष म्हणजे केवळ २० दिवसांमध्ये या सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं.

दरम्यान, २६ ऑक्टोबर २०१६ मध्ये या सिनेमाचा मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर शो झाला होता. ज्यावेळी या सिनेमाला स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं. त्यानंतर तो  १७ मार्च २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमासाठी राजकुमार रावला ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं होतं.

टॅग्स :बॉलिवूडराजकुमार रावसिनेमासेलिब्रिटी