त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर अखेर मराठीप्रेमींच्या दबावासमोर झुकत या संदर्भातील शासन आदेश रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. या निमित्ताने मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या हितासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. आज वरळीमध्ये विजय मेळावा होत आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारही उपस्थित आहेत.
या सभेत राज ठाकरेंनी भाषण करताना बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक ए.आर.रहमानचं कौतुक केलं. राज ठाकरेंनी रहमानचा एक प्रसंगही सांगितला. ते म्हणाले, "ए आर रहमान मद्रास ख्रिश्चनरी हायस्कूलमध्ये शिकले. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूत एका कार्यक्रमात व्यासपीठावर ए आर रहमान उपस्थित होते. निवेदिका समारंभात तामिळमध्ये बोलत होत्या. अचानक ती बाई हिंदीत बोलायला लागली. त्याच्यावर रहमानने तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला हिंदी?? आणि व्यासपीठावरुन खाली उतरला. तुमचा कडवटपणा हे तुम्ही शिक्षण कुठे घेतलं यावर नसतो तर तो आतमध्ये असावा लागतो". ए आर रहमानची कार्यक्रमातील ही क्लिप व्हायरल झाली होती.
दरम्यान, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात अनेक मराठी कलाकारांनीही उपस्थिती दर्शवली. तेजस्विनी पंडित, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या.