बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनने सध्या जो मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद सुरु आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माधवन त्याच्या आयुष्याच्या सुरुवातीला कोल्हापुरात राहिला होता. कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये माधवनने शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे माधवनने या वादाबद्दल दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादावर माधवन काय म्हणाला? जाणून घ्या.
भाषेच्या वादावर माधवन काय म्हणाला?
अलीकडेच एका मुलाखतीत माधवन म्हणाला की, “मी तामिळ आहे, पण मला हिंदी उत्तम येतं. मी जमशेदपूरमध्ये मोठा झालो, त्यामुळे तिथं हिंदीच बोलली जायची. पुढे मी कोल्हापूरमध्ये राहिलो, तिथे मी मराठीही शिकलो. त्यामुळे भाषेची कधीच अडचण वाटली नाही. जिथे मी राहिलो तिथली भाषा मी शिकली. त्यामुळे मला कधीही संवाद साधायला अडचण झाली नाही. भाषा ही आपल्याला जोडण्यासाठी असते, तोडण्यासाठी नाही.” अशाप्रकारे माधवनने मराठी विरुद्ध हिंदी भाषेच्या वादावर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माधवनने कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधून B.sc Electronics मधून शिक्षण पूर्ण केलंय. याच कॉलेजमध्ये शिकत असताना माधवनने कॉलेजमधील NCC मध्येही सहभाग घेतला होता. कोल्हापुराशी माधवनचं खास नातं आहे. तो अनेक मुलाखतींमध्ये कोल्हापूर आणि कॉलेजच्या दिवसांची आठवण जागवताना दिसतो. माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, नुकतंच त्याचा 'आप जैसा कोई' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमात माधवनसोबत फातिमा सना शेखने काम केलंय. याशिवाय काही महिन्यांपूर्वी माधवनचा अक्षय कुमारसोबत 'केसरी २' हा सिनेमा रिलीज झाला होता.