'प्यार का पंचनामा २', 'रागिनी एमएमएस रिटर्न्स' आणि 'उजडा चमन' यांसारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री करिश्मा शर्मा (Karishma Sharma) हिचा नुकताच अपघात झाला आहे. याबद्दल खुद्द तिनेच सोशल मीडियावर माहिती दिली. करिश्माने बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी मुंबईत धावत्या लोकल ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारली, ज्यामुळे तिला दुखापत झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करिश्मा शर्माने मुंबई लोकल ट्रेनमधून चर्चगेटला जात असताना धावत्या ट्रेनमधून उडी मारली. करिश्माने त्यावेळी साडी नेसली होती. अभिनेत्रीने असे का केले, याचे कारण सांगितले आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या संपूर्ण घटनेची माहिती शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे, ''काल, मी चर्चगेटला एका शूटिंगसाठी जात होती. त्या वेळी मी साडी नेसून ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. जशी मी ट्रेनमध्ये चढले, ट्रेनचा वेग वाढू लागला आणि मी पाहिले की माझ्या मैत्रिणीने ट्रेन पकडली नाही. मी घाबरून ट्रेनमधून उडी मारली आणि पाठीवर पडले, ज्यामुळे माझे डोके आदळले.''
करिश्माने पुढे तिला कुठे कुठे जखमा झाल्या आहेत, याबद्दल सांगितले. तिने लिहिले की, ''माझ्या पाठीला दुखापत झाली आहे. माझ्या डोक्याला सूज आली आहे आणि माझ्या शरीरावर जखमा आहेत. डोक्याला काही गंभीर दुखापत झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांनी एमआरआय करून घ्यायला सांगितलं आहे. मला एका दिवसासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. कालपासून मला खूप वेदना होत आहेत, पण मी खंबीर आहे. कृपया मी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा आणि मला तुमचे प्रेम पाठवा. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.''
करिश्माच्या मैत्रिणीने दाखवली तिची अवस्था दरम्यान, करिश्मा शर्माच्या एका मैत्रिणीने रुग्णालयातून तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तिची तब्येत कशी आहे ते दाखवले. फोटोमध्ये करिश्माचे डोळे बंद आहेत आणि तिला सलाइन लावली आहे. मैत्रिणीने लिहिले की, ''हे घडले यावर विश्वास बसत नाही. माझी मैत्रीण ट्रेनमधून पडली आणि तिला काहीही आठवत नाही. आम्ही तिला जमिनीवर पडलेले पाहिले आणि लगेच येथे आणले. डॉक्टर तपासणी करत आहेत. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा.''