बॉलीवूडमधील दमदार खलनायक आणि महाभारतातील दुर्योधनाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले पुनीत इस्सर हे अनेकांचे आवडते अभिनेते आहेत. पुनीत यांनी ‘कुली’ सिनेमाच्या सेटवरील १९८२ सालच्या अपघाताच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या. पुनीत यांचा जोरात ठोसा बिग बींना लागला आणि अमिताभ यांना थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. तो दिवस पुनीत इस्सर कधीच विसरणार नाहीत. याशिवाय पुनीत यांनी अमिताभ यांना मारण्याची सुपारी घेतली, असेही आरोप त्यांच्यावर लागले. काय घडलं होतं? जाणून घ्या.
पुनीत इस्सर यांच्यावर उडालेले शिंतोडे
१९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक अॅक्शन सीन करताना अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. या सीनमध्ये पुनीत इस्सर हे त्यांच्याशी लढत होते. यात एका मुक्क्यामुळे बच्चन यांना पोटात गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि काही काळ त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत पुनीत इस्सर म्हणाले, “तो एक अपघात होता. पण त्यानंतर लोकांनी माझ्यावर आरोप केले की मी मुद्दाम त्यांना मारले. काहींनी तर असेही म्हटले की मला हे करण्यासाठी पैसे दिले गेले.”
या अफवांमुळे पुनीत यांना चित्रपटसृष्टीतून काम मिळेनासं झालं. अनेक प्रोजेक्टमधून त्यांना काढून टाकण्यात आले. यामुळे त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण आला. पुनीत इस्सर हेही म्हणाले की, बच्चन यांनी या गोष्टीबद्दल कधीही त्यांच्यावर राग व्यक्त केला नाही. उलट उपचारादरम्यान त्यांनी पुनीत यांच्याशी बोलून त्यांना दिलासा दिला होता. “बच्चनसाहेबांनी स्वतः मला सांगितलं की तुझी काही चूक नाही,” असंही इस्सर यांनी स्पष्ट केलं. ‘कुली’ अपघातानंतर अनेक वर्षांनी पुनीत इस्सर यांनी या घटनेविषयी उघडपणे बोलत आपल्या मनातील भावना व्यक्त केली.