'डिंपल गर्ल' प्रीती झिंटा (Preity Zinta)बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती अमेरिकेत स्थायिक आहे. अधूनमधून ती भारतात येत असते. तसंच ती आयपीएलच्या पंजाब किंग्स संघाची मालकीण आहे. सध्या प्रीती आयपीएलसाठी भारतातच असून संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी हजर असते. अशातच आता प्रीतीनं तिच्या मनाचा मोठेपणा दाखवत एक कौतुकास्पद पाऊल उचललं आहे. भारतीय सैनिकांच्या विधवा पत्नी व त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी प्रितीने तब्बल १.१० कोटी रुपये देणगी दिली आहे.
प्रीतीनं ही देणगी दक्षिण-पश्चिम कमांडच्या 'आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन' (AWWA) ला दिली आहे. ही देणगी आयपीएल संघ पंजाब किंग्जच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत देण्यात आली. प्रीतीच्या या कार्यातून ती अमेरिकेत स्थायिक असली तरी भारताशी तिचं नातं अजूनही किती घट्ट आहे, हे दिसून आलं आहे.
शनिवारी जयपूरमध्ये झालेल्या एका विशेष कार्यक्रमात प्रिती झिंटा स्वतः उपस्थित होती. यावेळी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक सैन्य कुटुंबीय उपस्थित होते. मंचावर बोलताना प्रिती म्हणाली, "सैनिकांच्या कुटुंबांना मदत करणे हे केवळ सन्मान नाही तर जबाबदारीही आहे. आपल्या जवानांच्या बलिदानाची परतफेड कधीच शक्य नाही, पण त्यांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभं राहणं आपली जबाबदारी आहे. आम्ही भारतीय सैन्याच्या शौर्यावर अत्यंत अभिमान बाळगतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत".
प्रीती झिंटाचं हे पाऊल केवळ कौतुकास्पदच नाही, तर प्रेरणादायी आहे. तिचं हे योगदान हजारो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतं. प्रिती झिंटा ही स्वतः फौजी कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील दुर्गानंद झिंटा हे भारतीय सैन्यात मेजर होते. यामुळे तिला देशाप्रती आणि विशेषतः सैन्याप्रती खूप प्रेम आहे.
प्रीती झिंटाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री लवकरच राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर १९४७' या चित्रपटातून इंडस्ट्रीत कमब्रक करण्यास सज्ज झाली आहे. आमिर खान निर्मित हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. प्रितीच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट खास ठरणार आहे. कारण ती मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा चित्रपटात झळकणार आहे.