‘स्कॅम 1992’ या तुफान गाजलेल्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) सध्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) नाराज आहे. त्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. या ट्वीटमध्ये प्रतीकने मुंबई पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. व्हीआयपी मुव्हमेंटदरम्यान रस्त्यावरून पायी जात असताना मुंबई पोलिसांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचं ट्वीट त्याने केलं आहे.
प्रतीकचं ट्वीट‘मुंबईचा वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे व्हीआयपी सुरक्षेमुळे जाम होता. म्हणून शूटींग लोकेशनवर पोहोचण्यासाठी मी रस्त्यावरून पायी चालायला लागतो. यावेळी पोलिसांनी माझ्या खांद्याला धरून एका कुठल्याशा मार्बल गोदामात मला अक्षरश: ढकललं. तेव्हापर्यंत त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. मला अपमानित केलं गेलं,’असं ट्वीट प्रतीकने केलं आहे.
काल रविवारी मुंबईत पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार स्वीकारला. मुंबईतील माटुंगा इथल्या षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी काल मुंबईत होते. मीना खडीकर-मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर यांनी मोदींना मानपत्र आणि स्मृतीचिन्ह प्रदान केलं.
प्रतीक गांधीबद्दल सांगायचं झाल्यास, लवकरच तो महात्मा ज्योतिराव फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात झळकणार आहे. यात प्रतीक ज्योतिराव फुले यांची तर अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.