Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रभास झाला भावूक, म्हणाला, हा दिवस माझ्यासाठी कायम असेल भावनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 09:39 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटातून फक्त देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'बाहुबली : द बिगनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटातून फक्त देशभरातच नाही तर जगभरात लोकप्रिय झाला. आता त्याचे चाहते फक्त देशातच नाही सातासमुद्रा पार आहेत. या दोन्ही चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला. या चित्रपटातील सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. बाहुबली : द कन्क्लुजन या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाली. याबाबतची पोस्ट नुकतीच प्रभासने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

प्रभासने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले अकाउंट सुरू केले असून त्याने या अकाउंटवर 'बाहुबली : द कन्क्लुजन' या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाचा पोस्टर शेअर करून म्हटले की, 'दोन वर्षांपूर्वी 'बाहुबली : द कन्क्लुजन' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा दिवस माझ्यासाठी कायम भावनिक असेल. एस. एस. राजामौली आणि संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. माझ्यावर आणि चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचा मी खूप खूप आभारी आहे.'

'बाहुबली' चित्रपटात प्रभाससोबत राणा दुग्गाबत्ती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, सत्यराज आणि रम्या हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. 

सध्या प्रभास साहोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रभास सिनेमासाठी सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. या सिनेमात तो अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष देत आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

'साहो'मध्ये प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या विविध भाषांमध्ये शूट केला गेला आहे. प्रभासला 'साहो' सिनेमात अ‍ॅक्शन करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :प्रभासश्रद्धा कपूरजॅकी श्रॉफबाहुबली