Prakash Raj Slams Hindi Film Industry: प्रकाश राज हे लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनयासह ते स्पष्टवक्तेपणासाठीही खूप प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावरील पोस्टपासून ते बेधडक मुलाखतीमध्ये प्रकाश राज सरकारच्या धोरणांविरुद्ध बोलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अशातच आता प्रकाश राज यांनी राजकीय मुद्द्यांवर मौन बाळगणाऱ्यांना कलाकारांवर निशाणा साधला आहे.
प्रकाश राज यांनी 'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "अर्धे बॉलिवूड विकले गेले आहे आणि अर्धे घाबरले आहे. माझे स्वतःचे सहकारी घाबरले आहेत. कारण त्यांच्याकडे हिंमत नाही. माझा एक खूप जवळचा मित्र आहे जो मला म्हणाला, 'प्रकाश, तुझ्यात धाडस आहे, तू बोलू शकतोस, मी बोलू शकत नाही. तर मी त्याला म्हटलं की मला तुझी अवस्था समजते पण मी तुला माफ करू शकत नाही. कारण भविष्यात, जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा गुन्हेगारांना माफ केले जाईल. पण जे गप्प राहिले त्यांना नाही. प्रत्येकजण जबाबदार आहे".
राजकीय मुद्द्यांवर भाष्य केल्याचा परिणाम कामावर झाल्याचं प्रकाश राज यांनी कबूल केलं. ते म्हणाले, "असं नाही की माझ काम पुर्णपणे बंद झालं आहे. पण, जितकं मिळू शकलं असतं तितकं मिळत नाही. माझ्यासोबत काम केल्यानंतर अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, याची चिंता त्यांना असते". प्रकाश राज यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा 'रेट्रो' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला. यात सूर्या मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय त्याच्याकडे थलापती विजयचा 'जन नायकन' आणि पवन कल्याणचा 'दे कॉल हिम ओजी' हा चित्रपट देखील आहे.