Join us

"परेश रावल घाबरले होते, कारण..."; 'हेरा फेरी ३'च्या वादावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 10:25 IST

'हेरा फेरी ३'च्या वादावर दिग्दर्शक प्रियदर्शन पहिल्यांदाच म्हणाले. परेश रावल यांच्याविषयी केला मोठा खुलासा

‘हेरा फेरी ३’ या चित्रपटाविषयी काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. परेश रावल यांनी हा चित्रपट सोडल्याने सर्वांना धक्का बसला होता. इतकंच नव्हे ‘हेरा फेरी ३’ बनणार की नाही, इथवर गोष्टी गेल्या होत्या. परंतु नंतर सर्व वाद मिटले आणि परेश रावल ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा सहभागी झाले. या सर्व वादावर ‘हेरा फेरी ३’चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी आता एक मोठी गोष्ट सांगितली आहे. त्यामुळे नक्की काय घडलं होतं, याचा खुलासा प्रियदर्शन यांनी केला आहे. 

प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी ३'बद्दल काय सांगितलं?

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन म्हणाले की, ''माझा आणि परेश रावल यांचा कधीच वाद झाला नव्हता. अक्षय कुमार आणि परेश यांच्यातही काहीच अडचण नव्हती. काही लोकांनी परेश रावल यांच्यावर दबाव आणला, त्यामुळे ते घाबरले होते आणि त्यांनी सुरुवातीला सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतला. या वादामुळे आमच्या नात्यावर काहीच परिणाम झाला नाही.'' 

पुढे बोलताना प्रियदर्शन यांनी सांगितले, ‘'अक्षयने मला म्हटलं होतं की, ‘प्रिन्स सर, जर हा चित्रपट बनत असेल तर चांगलंच आहे. नाहीतर सोडून देऊया.’ बस एवढंच. काही लोकांनी यात अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यांच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही, म्हणून मी बोलत नाहीये. आशा आहे की आयुष्यात चांगलंच होईल. ही चित्रपट निर्मिती आहे, या जगात तुमचे शत्रू, मित्र, चाहते, समीक्षक, खूप काही असतात. मी या क्षेत्रात ४० वर्षे कशी घालवली, हे मला आजही कळत नाही. पण आहे हे असं आहे.’'

अशाप्रकारे प्रियदर्शन यांनी ‘हेरा फेरी ३’ बद्दल झालेल्या वादाचा खुलासा केला. आता परेश रावल यांच्यावर नक्की कोणाचा दबाव होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ‘हेरा फेरी ३’चं सध्या शूटिंग असूुन पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :परेश रावलबॉलिवूड