अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) सध्या 'हेरा फेरी ३'मुळे चर्चेत आहेत. सिनेमाचं शूट सुरु होण्यापूर्वीच त्यांनी यातून बाहेर पडत सर्वांना धक्काच दिला आहे. परेश रावल यांचं 'बाबुराव आपटे' कॅरेक्टर खूप गाजलं. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही अभिनेत्याची कल्पनाही करु शकत नाही अशीच अनेकांनी प्रतिक्रिया दिली. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर अक्षय कुमारने त्याच्या प्रोडक्शन कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यावर नुकसानभरपाईचा दावा केला. तर आता परेश रावल यांनी वकिलांच्या मार्फत सर्व आरोपांवर उत्तर दिलं आहे.
सिनेमा सोडल्यानंतर झालेल्या आरोपांवर परेश रावल यांनी वकील अमित नाइक यांच्यामार्फत कायदेशीर उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, "मी सिनेमा का सोडला याचं उत्तर माझ्या वकिलांनी रीतसर पाठवलं आहे. आता सगळं काही स्पष्ट होईल."
सिनेमा सोडल्याची कारणं
यानंतर आयएनएसच्या रिपोर्टनुसार, परेश रावल यांच्या वकिलांनी सांगितले की, "परेश रावल यांना सिनेमाची गोष्ट, स्क्रीनप्ले आणि एक लांबलचक ड्राफ्ट मिळालाच नाही जो त्यांच्यासाठी फार गरजेचा होता. याच कमतरतेमुळे त्यांनी सिनेमा सोडला. तसंच ओरिजनल सिनेमाचे निर्माते नाडियादवाला यांनी परेश रावल यांना नोटीस पाठवून सिनेमावर आक्षेप घेतल्यानेही त्यांनी प्रोजेक्ट सोडला. तसंच व्याजासकट पैसेही परत केले. त्यांनी टर्म शीट (सुरुवातीचा कॉन्ट्रॅक्ट) सुद्धा रद्द केला आहे." ही गोष्ट त्यांनी फिरोज नाडियादवाला यांना उद्देशून सांगितली. तसंच आपसी संबंधांवर परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी सिनेमापासून लांब राहणं पसंत केलं.
किती मिळणार होतं मानधन?
तसंच सिनेमाशी निगडीत सूत्रांनुसार, परेश रावल यांना सिनेमासाठी १५ कोटी रुपये मानधन मिळणार होतं. ज्यातील १४ कोटी ८९ लाख त्यांना सिनेमा रिलीज झाल्याच्या एक महिन्यानंतर मिळणार होते. पुढील महिन्यात सिनेमाचं शूट सुरु होणार होतं आणि २०२७ मध्ये सिनेमा रिलीज होणार होता. मात्र परेश रावल यांना या अटी मान्य नव्हत्या. त्यामुळे आता परेश रावल आणि अक्षय कुमार यांच्या कायदेशीर लढाईही सुरु झाली आहे.
बाबुरावच्या भूमिकेचा कंटाळा आला
परेश रावल यांनी नुकतंच एका मुलाखतीत बाबुरावच्या भूमिकेचा कंटाळा आल्याचंही वक्तव्य केलं होतं. हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास असं ते म्हणाले होते. बाबुरावपासून मला मुक्ती हवी आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती.