Join us

मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...

By ऋचा वझे | Updated: May 18, 2025 13:38 IST

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडल्याचं कन्फर्म केलं आहे.

बहुप्रतिक्षित सीक्वेल 'हेरा फेरी ३' मधून अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वीच अशी बातमी आली की मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे परेश रावल हा सिनेमा करणार नाहीत. बाबूराव आपटे या आयकॉनिक भूमिकेतून परेश रावल यांना कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र अचानक सिनेमाच्या तिसऱ्या भागातून ते बाहेर पडल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. आता परेश रावल यांनी स्वत: ट्वीट करत यावर स्पष्टीकरण  दिलं आहे.

परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मधून बाहेर पडल्याचं कन्फर्म केलं आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले, "मला इथे स्पष्ट करायचं आहे की हेरा फेरी ३ मधून बाहेर पडण्याचा निर्णय हा मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे घेण्यात आलेला नाही. मी पुन्हा सांगतो की माझे फिल्ममेकर्ससोबत कोणताही क्रिएटिव्ह मतभेद झालेले नाहीत. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल माझ्या मनात खूप प्रेम, आदर आणि विश्वासाची भावना आहे."

परेश रावल यांचं हे ट्वीट आता व्हायरल झालं आहे. या ट्वीटमधून त्यांनी सिनेमा सोडण्याचं कारण मात्र स्पष्ट केलेलं नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांनी सिनेमाच्या शूटला सुरुवातही केली होती. सेटवरुन अक्षय आणि सुनील शेट्टीबरोबरचा त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. तसंच सिनेमाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होईल अशी चर्चा होती. मात्र आता सिनेमातून बाबूभैय्याच बाहेर पडल्याने प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 'आता हा सिनेमा बनवूच नका कारण आता ती मजा राहणार नाही','परेशजी या निर्णयामागचं कारण सांगा','तुमच्याशिवाय सिनेमात मजा नाही येणार' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल?

काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांनी त्यांच्या गाजलेल्या बाबूरावच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती. या भूमिकेचा आता त्यांना कंटाळा आल्याचं ते म्हणाले होते. हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास असंही ते मुलाखतीत म्हणाले होते.

टॅग्स :परेश रावलसिनेमाबॉलिवूडअक्षय कुमारसुनील शेट्टी