'हेरा फेरी ३'मधून परेश रावल यांनी एक्झिट घेतल्यानंतर चाहते नाराज झाले होते. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांनाही धक्का बसला होता. बाबूभैय्या आणि परेश रावल यांच्याशिवाय 'हेरा फेरी ३' सिनेमा कसा होणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. शेवटी मनधरणी करून परेश रावल पुन्हा 'हेरा फेरी ३'चा भाग झाले आहेत आणि सिनेमात बाबूभैय्या हे पात्र साकारणार आहेत.
'हेरा फेरी ३'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मिड डेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी परेश रावल यांनी त्यांची माफी मागितल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, "अक्षय आणि परेश यांनी फोन करून मला सांगितलं की आता सगळं काही ठीक झालं आहे. सर, मी हा सिनेमा करतोय असं जेव्हा परेश रावल म्हणाले तेव्हा मला आश्चर्य वाटलं. तुमच्याप्रती माझ्या मनात आदराची भावना आहे. मी तुमच्यासोबत २६ सिनेमे केले आहेत आणि मला हा सिनेमा सोडण्याचं वाईट वाटत आहे. पण काही वैयक्तिक कारणं होती, असं मला परेश म्हणाले".
"मी कोणताही सिनेमा केला तरी तो हेरा फेरीपेक्षा चांगला होऊ शकत नाही. हेरा फेरी २ चांगला बनला नव्हता. तो हॉलिवूड सिनेमाचा रिमेक होता. पण, या तिघांशिवाय हेरा फेरी सिनेमा बनूच शकत नाही. एक हिऱ्याचे व्यापारी विमानात मला भेटले. ते मला म्हणाले की परेश रावल यांना परत आणा. नाहीतर आम्ही सिनेमा बघणार नाही", असंही पुढे त्यांनी सांगितलं.