भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम (Dr. APJ Abdul Kalam) ज्यांना सगळे 'मिसाईल मॅन' असंही म्हणतात. ते भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. सामान्य जनतेमध्येही त्यांची खूप लोकप्रियता होती. लहान मुलांचेही ते आवडते होते. त्यांच्यामुळे अनेक मुलं प्रेरित झाली आणि शास्त्रज्ञ बनली. कलाम यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) कलाम हा सिनेमा घेऊन येणार आहे. सिनेमा साऊथ अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कोण आहे तो?
ओम राऊतचा 'आदिपुरुष' जोरदार आपटला होता. सिनेमावर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतर आता ओम राऊतने एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा केली आहे. नुकताच तो कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. तेव्हाच ओम राऊत नवीन प्रोजेक्टची घोषणा करणार का असा अंदाज अनेकांनी लावला होता. त्याप्रमाणे त्याने काल कान्समध्ये टायटल पोस्टर शेअर केले. तर या सिनेमात अभिनेता धनुष (Dhanush) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. भूषण कुमार, अभिषेक अग्रवाल, अनिल सुंकरा या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.
ओम राउतने सोशल मीडियावर याची घोषणा करत लिहिले, "रामेश्वरपासून ते राष्ट्रपती भवनपर्यंत, महान व्यक्तीचा प्रवास सुरु होतोय...भारताचा मिसाईल मॅन रुपेरी पडद्यावर.. मोठी स्वप्न बघा..उंच उडा. कलाम-द मिसाईल मॅन ऑफ इंडिया."
ओम राऊतने याआधी बनवलेल्या 'आदिपुरुष' सिनेमाचं बजेट तब्बल ७०० कोटी होतं. हा भारतीय इतिहासातील सर्वात बिग बजेट सिनेमांपैकी एक होता. एवढा खर्च करुनही सिनेमा बराच ट्रोल झाला. यातील काही संवादांवर आक्षेप घेण्यात आला होता. इतकंच नाही तर सिनेमाचं VFX ही अजिबातच जमलं नव्हतं. त्यामुळे ओम राऊतला आजही त्यावरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आता कलाम यांच्यावरील बायोपिकमधून तरी ओम राऊतचं हिंदीतील करिअर सावरतंय का हे पाहणं महत्वाचं आहे.