Join us  

बॉलिवूडमध्ये Ageismचा वाद; नीना गुप्ता म्हणाल्या, कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तर आम्हाला द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:01 AM

आधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism  अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे.

ठळक मुद्देरंगोलीच्या ट्वीटला नीना गुप्ता यांनी पाठींबा दिला तरी ‘सांड की आंख’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी तापसी पन्नू मात्र या ट्वीटने भडकली.

‘सांड की आंख’ या चित्रपटावरून बॉलिवूडमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. होय, याआधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism  अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे.  ‘सांड की आंख’ या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या दोन अभिनेत्रींनी शूटर दादी या दोन वयस्क महिलांची भूमिका साकारली आहे. यावरूनच हा वाद सुरु झाला आणि या वादाला सुरुवात झाली ती कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल हिच्या एका ट्वीटमुळे. रंगोलीच्या ट्वीटनंतर ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनीही या वादात उडी घेतली.

 रंगोलीचे  ट्वीट अन् सुरु झाला वाद... ‘सांड की आंख’साठी पहिला रोल कंगना राणौतला ऑफर झाला होता. पण कंगनाने ही भूमिका नाकारली. ही भूमिका एखाद्या वयस्क अभिनेत्रीला द्यावी, असेही ही भूमिका नाकारताना कंगनाने सुचवले होते. नीना गुप्ता आणि रम्या कृष्णन यांच्या नावाला कंगनाने पसंती दिली होती, असे ट्वीट रंगोलीने केले. रंगोलीच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी रंगोलीच्या या ट्वीटचे समर्थन केले. यातलेच एक नाव म्हणजे नीना गुप्ता.

 

कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तरी आम्हाला द्या...रंगोलीच्या ट्वीटचे समर्थन करत, नीना गुप्ता यांनी Ageism  च्या वादात उडी घेतली. मी याच्याशी सहमत आहे. कमीत कमी आमच्या वयाच्या भूमिका तरी आम्हाला करू द्या, असे ट्वीट नीना यांनी केले. अर्थात काही वेळानंतर आणखी एक ट्वीट करत नीना यांनी ‘सांड की आंख’साठी तापसी व भूमी यांना शुभेच्छाही दिल्यात. ‘सांड की आंखचा ट्रेलर मला आवडला. मी भूमी व तापसीचा आदर करते. चित्रपटाला गुड लक देते. अनुराग कश्यपलाही शुभेच्छा देते... चलो, अपना टाइम आएगा...,’ असे नीना यांनी दुस-या ट्वीटमध्ये लिहिले.

तापसी मात्र भडकली

रंगोलीच्या ट्वीटला नीना गुप्ता यांनी पाठींबा दिला तरी ‘सांड की आंख’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी तापसी पन्नू मात्र या ट्वीटने भडकली. ‘अनुपम खेर यांनी सारांशमध्ये सर्वोत्तम काम केले होते, तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला? नर्गिस दत्तने सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारली, काय तेव्हा आम्ही बोललो? जॉन ट्रवोल्टाने हेअरस्प्रे या चित्रपटात एक महिलेची भूमिका साकारली, काय तेव्हा कुणी प्रश्न केला? आमिर खानने 3 इडियट्समध्ये एका कॉलेज तरूणाची भूमिका साकारली, काय तेव्हा कुणी बोलले?,’ असे सवाल तापसीने केले.

 

टॅग्स :नीना गुप्ताकंगना राणौततापसी पन्नू