टीव्हीची आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय लवकरच अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ चित्रपटात दिसणार आहे. यापाठोपाठ आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्ये तिची वर्णी लागलीये. याशिवाय जॉन अब्राहमसोबत ‘रोमियो अकबर वॉल्टर’ हा चित्रपटही तिच्या झोळीत पडला आहे. पण ही यादी इथेच संपत नाही तर आता एक चौथा चित्रपटही मौनीला मिळाल्याची खबर आहे. होय, या चित्रपटाचे नाव आहे, ‘मेड इन चायना’. या चित्रपटात मौनी राजकुमार रावसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. राजकुमारच्या पत्नीच्या भूमिकेत ती यात दिसेल. येत्या सप्टेंबरपासून मिखील मुसळे दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित या चित्रपटाचे शूटींग सुरू होत असल्याचे कळतेय.
ताज्या माहितीनुसार, राजकुमार यात एका गुजराती व्यापाऱ्याच्या तर मौनी ही मुंबई गर्लच्या भूमिकेत आहे. राजकुमारची लग्न झाल्यावर मौनी मुंबईतून गुजरातेत येते. आपल्या पतीवर प्रेम करणारी, त्यालाच सर्वस्व मानणारी मौनी प्रत्येक संघर्षात आपल्या पतीच्या बाजूने उभी राहते. पतीला चीनमध्ये व्यापारी संधी चालून येतात. तेव्हा ती त्याला ही संधी स्वीकारण्यासाठी तयार करते. या प्रवासातला या जोडप्याचा संघर्ष या चित्रपटात दिसणार आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातही मौनी अक्षय कुमारच्या आॅनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारते आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी रिलीज झाली आहेत/ लोकांना अक्षय व मौनीची जोडीही आवडली आहे. आता राजकुमार व मौनीची जोडी प्रेक्षकांच्या मनात किती जागा निर्माण करते, ते बघूच.
मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे.