Miss Universe India 2025: 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' ही स्पर्धा नुकतीच पार पडली. मनिका विश्वकर्माने 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा खिताब नावावर केला. राजस्थानची लेक यंदाची 'मिस युनिव्हर्स इंडिया'ची विजेती ठरली. या स्पर्धेत देशातून ४८ स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. मनिका विश्वकर्माने बाजी मारत 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा मुकुट मिळवला. तर उत्तर प्रदेशची तान्या शर्मा पहिली उपविजेती, हरियाणाची महक ढींगरा दुसरी उपविजेती आणि अमीषी कौशिक तिसरी उपविजेती ठरली.
राजस्थानमधील जयपूरमध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'चा इव्हेंट पार पडला. 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२४' रिया सिंघाने मनिका विश्वकर्माला 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा मुकुट घातला. ४८ स्पर्धकांमधून टॉप २० निवडण्यात आले होते. ज्यांनी स्वीमसूट घालून फिटनेस आणि आत्मविश्वासाचं प्रदर्शन दिलं. त्यानंतर यातून निवडण्यात आलेल्या टॉप ११ स्पर्धकांमध्ये बुद्धिमत्तेच्या आधारावर मनिका विश्वकर्माची 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५'म्हणून निवड करण्यात आली. आता मनिका मिस युनिव्हर्स २०२५मध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
कोण आहे मनिका विश्वकर्मा?
मनिका राजस्थानच्या गंगानगर येथील आहे. सध्या ती दिल्लीत पॉलिटिकल सायन्स आणि इकोनॉमिक्सचं शिक्षण घेत आहे. यासोबतच ती मॉडेलिंगही करत होती. ती एक क्लासिकल डान्सरही आहे. तिने मिस युनिव्हर्स राजस्थान २०२४चा खिताब जिंकला होता.