Madhu Sapre: १९९० च्या दशकात मधु सप्रे हे नाव मॉडेलिंग आणि ग्लॅमरच्या दुनियेतील एक सर्वाधिक चर्चेत असणारं नाव होतं. अत्यंत कमी वेळात प्रसिद्ध मिळवून देशाची पहिली 'सुपरमॉडल' म्हणून तिने ओळख मिळवली. साल १९९२ मध्ये तिने 'मिस इंडिया'चा खिताब जिंकला. याशिवाय 'मिस युनिव्हर्स' सारख्या मोठ्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं. तिने २००३ मध्ये 'बूम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचदरम्यान, प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मधु सप्रे एका फोटोशूटमुळे वादात सापडली आणि तिच्या करिअरला उतरती कळा लागली.
मधु सप्रे हे नाव तेव्हा त्यावेळी सर्वात जास्त चर्चेत आलं जेव्हा तिने तिचा प्रियकर मिलिंद सोमणसोबत एका शूज कंपनी फिनिक्ससाठी फोटोशूट केलं होतं. गळ्यात अजगर आणि पायात त्या कंपनीचे शूज घालून त्यांनी न्यूड फोटोशूट केलं होतं. या जाहिरातीमुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मधु आणि मिलींद सोमणच्या अडचणी वाढल्या. या जाहिरातीची गणती आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त जाहिरातींमध्ये होते
दरम्यान, या वादग्रस्त जाहिरातीनंतर मुंबई पोलिसांनी १९९५ मध्ये मधु सप्रे आणि मिलिंद यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता. जाहिरातीत अजगराच्या वापरावरही टीका झाली होती. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टअंतर्गत संबंधित जाहिरात कंपनीविरोधातही गुन्हा दाखल केला गेला होता. तब्बल १४ वर्षे हा खटला सुरु होता. अखेर १४ वर्षांनंतर मिलिंद व मधु दोघांनाही निर्दोष सुटका झाली. पण, त्या एका जाहिरातीचा तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाली. मधुचं करिअर बर्बाद झालं. त्यानंतर मधूने २००१ मध्ये इटलीतील आईस्क्रिम बिझनेसमॅन जिआर मारियासोबत लग्न केलं आणि ती आपल्या कुटुंबीयांसह इटलीत स्थायिक झाली. तिला एक गोंडस मुलगी देखील आहे.