Join us

वयाच्या ८६ व्या वर्षी दोरीवरच्या उड्या, मिलिंद सोमणने शेअर केला आईचा व्हिडीओ, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 15:59 IST

कधी पुशअप्स, कधी मॅरेथॉन तर आता दोरीवरच्या उड्या मारतायेत उषा सोमण

जबरदस्त फिटनेस अशी ओळख असलेला अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) कायम चर्चेत असतो. कधी तो पुशअप्स करताना दिसतो तर कधी मॅरेथॉनमध्ये धावताना दिसतो. त्याच्या फिटनेसला तोडच नाहीये.  त्याची पत्नी अंकिताही त्याला तितकीच साथ देते. ती देखील मिलिंदसोबत कितीही किलोमीटर मॅरेथॉन असो धावताना दिसते. आश्चर्य म्हणजे मिलिंद सोमणची आई उषा सोमण (Usha Soman) या सुद्धा कमालीच्या फिट आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षीही त्या चक्क दोरीच्या उड्या मारत आहेत. याचीच झलक मिलिंदने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दाखवली आहे.

मिलिंद सोमणची आई उषा सोमण यांचं वय आता ८५ पूर्ण आहे. या वयातही त्यांचा फिटनेस कमालीचा आहे. उषा सोमण यांचे याआधीही अनेक व्हिडिओ व्हायरल झाते ज्यात त्या लेकासोबत मॅरेथॉन पळताना दिसल्या आहेत. तर कधी सूनेसोबत लंगडीही खेळताना दिसल्या आहेत. या वयातही उषा सोमण चांगल्याच अॅक्टिव्ह आहेत. याचीच झलक आता नव्या व्हिडिओतून पाहायला मिळत आहे. मिलिंद सोमणने आईचा दोरीच्या उड्या मारतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत तो लिहितो, "फॅमिली स्किपिंग टाईम. आई आता ८६ वर्षांची आहे. तिच्या दररोजच्या अॅक्टिव्हिटीमध्ये योगसोबतच दोरीच्या उड्या मारणंही आहे. सगळ्यांनाच दीर्घ, निरोगी आणि आनंदी आयुष्य लाभो."

व्हिडिओमध्ये त्यांची सून अंकिताही दिसत आहे. त्या सूनेसोबतही दोरीवरच्या उड्या मारण्याचा आनंद घेत आहेत. मिलिंदने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत लिहिले, 'या वयातही दोरीच्या उड्या मारतात, भारीच','तुमचं कुटुंब खूपच प्रेरणादायी आहे','कडक फिटनेस'.

टॅग्स :मिलिंद सोमण फिटनेस टिप्ससेलिब्रिटी