Join us  

दलेर मेहंदीमुळे मिका सिंग अजूनही आहे अविवाहित?; भावावर केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 3:47 PM

Mika singh: 'आखं मारे', 'लाँग ड्राइव्ह' अशा किती गाण्यांसाठी प्रसिद्ध असणारा मिका त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. मिका अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमुळेच चर्चेत आला आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांच्या यादीत मिका सिंग (mika singh) याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. 'आखं मारे', 'लाँग ड्राइव्ह' अशा किती गाण्यांसाठी प्रसिद्ध असणारा मिका त्यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. मिका अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमुळेच चर्चेत आला आहे. यात राखी सावंतला त्याने केलेलं किसचं प्रकरण तर चांगलंच गाजलं होतं. विशेष म्हणजे मिकाने अद्यापही लग्न केलं नसून त्याने लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. मिकाने केवळ कारण सांगितलं नाही तर त्याने त्याच्या भावावर दलेर मेहंदीवर काही मजेशीर आरोपही केले आहेत.

अलिकडेच मिकाने त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सध्या तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. आतापर्यंत मिकाचं नाव अनेक अभिनेत्री, मॉडेल्ससोबत जोडलं गेलं आहे. परंतु, लग्नाच्या चर्चांवर त्याने कायम मौन बाळगल्याचं पाहायला मिळालं. मात्र,एका कॉमेडी शोमध्ये मिकाने त्याच्या लग्नावर भाष्य केलं आहे. तसंच तो पहिल्यांदाच त्याच्या ब्रेकअपविषयी व्यक्त झाला.

सध्या सोशल मीडियावर मिकाची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. हे मुलाखत २०१७ सालची आहे. एका कॉमेडी शोमध्ये मिका त्याचा भाऊ दलेर मेहंदी (Daler Mehndi) यांच्यासोबत आला होता.

"सुरुवातीच्या काळात मी दलेर मेहंदी यांच्या टीममध्ये गिटारिस्ट म्हणून काम करायचो. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ दलेर यांच्यासोबतच जायचा. त्याच काळात मी एका रिलेशनशीपमध्येही होतो. त्यामुळे त्या मुलीशी बोलता यावं यासाठी मी दलेर यांच्या लँडलाइनचा फोन नंबर दिला होता", असं मिका म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "एकदा त्या मुलीने दलेर यांच्या लँडलाइनवर फोन केला आणि दलेर पाजी तिच्या काय बोलले माहित नाही पण त्यानंतर त्या मुलीने माझ्यासोबत ब्रेकअपच करुन टाकला. मला त्यावेळी खरंच त्रास झाला होता. आणि, हो. त्यामुळेच माझं अजूनपर्यंत लग्न न होण्याचं कारण म्हणजे दलेर पाजीच आहेत."

दरम्यान, दलेर मेहंदी यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या एक मुलाखतीमध्ये मिकाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. 'उलटपक्षी मी लग्नासाठी त्याच्या मागे लागलोय'. असं ते म्हणाले होते. 'मिकाने लवकर लग्न करावं हीच माझी अपेक्षा आहे', असं ते म्हणाले होते.

टॅग्स :मिका सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा