'धक धक गर्ल' म्हणून ओळख मिळवलेल्या व बॉलिवूडमधल्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत माधुरी दीक्षितचं (Madhuri Dixit) नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या माधुरीनं अनेक हीट चित्रपट दिले आहेत. ती आजही लाखो हृदयांची धडकन आहे. माधुरी दीक्षित ही फक्त अभिनयातच नव्हे तर घरगुती कामातही तितकीच कुशल आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावर ती पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासाठी आपल्या हातानं जेवण बनवायची. नुकतंच एका मुलाखतीत माधुरीनं यासंदर्भात एक मजेदार किस्सा सांगितला आणि सर्वांनाच हसू आलं.
माधुरी दीक्षितने तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांच्याशी लग्न केलं आणि अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेतला. लग्नानंतर ती अमेरिकेतील डेन्व्हर (Denver) शहरात स्थायिक झाली. या नव्या आयुष्याची सुरुवात करताना माधुरीनं एका गृहिणीची जबाबदारीही मनापासून स्वीकारली होती. ती दररोज पहाटे ५:३० वाजता उठून पतीसाठी स्वतः नाश्ता तयार करायची. त्यावेळी नेने कार्डिओथोरॅसिक सर्जन म्हणून काम करत होते.
सिमी गरेवाल (Simi Garewal) यांच्यासोबतच्या एका जुन्या मुलाखतीत माधुरी दीक्षितनं एक मजेशीर किस्सा शेअर केला होता. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर तिनं डॉ. श्रीराम नेने यांच्यासाठी खास "मसाला कोळंबी" बनवायचं ठरवलं. पण, त्यावेळी तिला एक गोष्ट माहिती नव्हती की अमेरिकेत मिळणाऱ्या कोळंब्या आधीच शिजवलेल्या असतात.
माधुरीनं त्या कोळंब्या आणल्या आणि भारतीय पद्धतीने पुन्हा शिजवल्या. परिणामी त्या कोळंब्यांची चव रबरासारखी झाली. तरीही आपल्या बायकोच्या प्रेमाखातर डॉ. श्रीराम नेने यांनी ते अति शिजवलेले कोळंबीचे घासही हसतमुखाने गिळले. हा किस्सा सांगताना माधुरीनं खुद्कन हसत हेही कबूल केलं की, सुरुवातीला तिला स्वयंपाकात बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागल्या आणि त्या शिकताना असे अनेक मजेदार अनुभवही आले. पण, या संपुर्ण काळात डॉ. नेने नेहमीच पाठिंबा देत असल्याचं तिनं सांगितलं.