कुमार सानू गाणार मराठी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 17:00 IST
कुमार सानू यांचे साजन या चित्रपटातील मेरा दिल भी कितना पागल है, आशिकी या चित्रपटातील एक सनम चाहिये तसेच ...
कुमार सानू गाणार मराठी चित्रपटात
कुमार सानू यांचे साजन या चित्रपटातील मेरा दिल भी कितना पागल है, आशिकी या चित्रपटातील एक सनम चाहिये तसेच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील तुझे देखा तो ही गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. पण सध्या कुमार सानू हिंदी चित्रपटात खूपच कमी गाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुमार सानू चित्रपटांमध्ये गाण्याऐवजी गाणी युट्युबला अपलोड करत आहेत.आजच्या चित्रपटातील गाण्यांचे बोल त्यांना आवडत नसल्याने त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये गाण्याचे प्रमाण खूपच कमी केले आहे. गाणी ही केवळ नाचण्यासाठीच असतात असे आजच्या पिढीचे म्हणणे असल्याचे त्यांना वाटते. नव्वदीच्या दशकांत गाण्यांमध्ये असलेला गोडवा आज अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांपासून दूर राहाणेच पसंत करतो असे ते सांगतात. हिंदीच्या तुलनेत प्रादेशिक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी बनवली जात आहेत. या गाण्यांचे बोल खूपच चांगले असतात. तसेच या गाण्यांना संगीतही खूप चांगले दिले जाते. या गाण्याच्या संगीताला त्या प्रादेशिक भाषेचा टच असतो. त्यामुळे मी प्रादेशिक भाषेत गाणे अधिक पसंत करतो असेही कुमार सानू सांगतात. कुमार सानू आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांसाठी गायले आहेत आणि आता हलके हलके या आगामी मराठी चित्रपटात कुमार सानूंचा आवाज रसिकांना ऐकायला मिळणार आहे. या गाण्याचे संगीत पी.शंकरम यांनी दिले आहे. मराठीत अतिशय चांगली गाणी बनत असून अजय-अतुल या जोडीसोबत भविष्यात गाण्याची इच्छा आहे. तसेच 2017ला मी चार-पाच मराठी चित्रपटात गाणार आहे असेही कुमार सानू यांनी सांगितले.