अभिनेत्री, दिग्दर्शिका कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) तिच्या उत्तम अभिनयासाठी, कौशल्यासाठी ओळखली जाते. 'वेक अप सिड','मेट्रो' यासारख्या सिनेमांमध्ये तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तसंच 'लस्ट स्टोरीज २' मध्ये तिने दिग्दर्शित केलेल्या गोष्टीचीही वाहवाही झाली. कोंकणा आता वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सात वर्ष लहान अभिनेत्याला ती डेट करत असल्याची चर्चा आहे.
कोंकणा सेन शर्माचा २०२० साली घटस्फोट झाला आहे. अभिनेता रणवीर शौरीसोबत तिचा १० वर्षांचा संसार मोडला. त्यांना एक मुलगाही आहे जो आता १४ वर्षांचा आहे. कोंकणा एकटीच मुलाचा सांभाळ करते. लेकासाठी कोंकणा आणि रणवीर अनेकदा एकत्र येतात. मात्र आता कोंकणाच्या आयुष्यात अभिनेता अमोल पराशरची(Amol Parashar) एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. दोघंही काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अमोल पराशरची 'ग्राम चिकित्सालय' ही सीरिज नुकतीच रिलीज झाली. डेटिंगच्या चर्चांदरम्यान याच सीरिजच्या स्पेशल स्क्रीनिंगला कोंकणा सार्वजनिकरित्या पहिल्यांदाच अमोलसोबत दिसली. दोघांनी एकत्र कॅमेऱ्यासमोर पोजही दिली. यामुळे आता त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
अमोल पराशर हा विनोदी अभिनेता आहे. 'ट्रिपलिंग' या सीरिजमधून त्याला लोकप्रियता मिळाली. 'टीव्हीएफ'च्या 'ग्राम चिकित्सालय' या शोमध्ये त्याला मोठी संधी मिळाली आहे. सीरिजमध्ये अभिनेते विनय पाठक यांच्यासोबत त्याची जुगलबंदी आहे. सध्याया सीरिजचं खूप कौतुक होत आहे. 'पंचायत' या गाजलेल्या सीरिजच्या मेकर्सने पुन्हा एकदा गावातली कहाणी दाखवणारी ही हलकी फुलकी सीरिज आणली आहे.
याआधी अमोल पराशरने एका मुलाखतीत कन्फर्म केलं होतं की तो एका सीरियस रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र त्याने तिचं नाव सांगितलं नव्हतं. आपल्या लोकांनी कामासाठी ओळखावं अशी त्याची इच्छा आहे. अमोल पराशर आमि कोंकणा २०१९ साली आलेल्या 'डॉली किट्टी और वो चमकते सितारे' या सिनेमात एकत्र दिसले होते.