Kartik Aaryan Sparks Bhool Bhulaiyaa 4 Rumours: 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa) ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रँचायझी आहे. २००७ साली अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा 'भूल भुलैया' चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर कार्तिक आर्यन यानं 'भूल भुलैया २'मध्ये "रुह बाबा" बनून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर कार्तिक 'भूल भुलैया ३' घेऊन आला. आता त्यापुढचा भाग म्हणजेच 'भूल भुलैया ४' येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अलीकडेच कार्तिकनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
कार्तिकनं इन्स्टाग्रामवर एक 'एआय'ने तयार केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कार्तिक हा "रुह बाबा" लूकमध्ये दिसत आहे. तर त्याच्या हातात मंजुलिकासारखी दिसणारी एक बाहुली आहे. या फोटोसोबत कॅप्शनमध्ये त्यानं 'I Labubu you' असं लिहलं. त्याच्या या पोस्टवरुन कार्तिक हा लवकरच 'भूल भुलैया ४' घेऊन येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याच्या या फोटोमागचं सत्य थोडं वेगळं आहे.
कार्तिकची ही पोस्ट चित्रपटासंदर्भात नसून तो एक सोशल मीडियावरील ट्रेंड फॉलो करताना दिसलाय. सध्या सोशल मीडियावर एका खास बाहुलीची चर्चा आहे. या बहुलीचे नाव आहे 'लबुबू डॉल' असं आहे. या लबुबू डॉलचा चेहरा थोडा गोंडस पण कुरूप आणि विचित्रही आहे. जी अलीकडे नेटकर्यांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. लोक या बाहुलीसोबतचे मजेशीर फोटो आणि मीम्स पोस्ट करत आहेत.
तर कार्तिकनं या ट्रेंडमध्ये सहभागी होत आपल्या "रुह बाबा" लूकमध्ये एक फोटो तयार केला आणि त्याच्या हातात 'लबुबू'ऐवजी मंजुलिकासारखी बाहुली ठेवली. त्यानं मंजुलिकालाच आपली 'लबुबू डॉल' असल्याचं दाखवलं. हे कॅप्शन आणि फोटो पाहून अनेकांनी अंदाज लावला की 'भूल भुलैया ४'चं प्रमोशन सुरू झालं आहे. पण, कार्तिकनं चित्रपटासंदर्भात काहीही भाष्य केलेलं नाही.
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो करण जोहरच्या 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'आशिकी ३', 'पत्नी पत्नी और वो २', 'नागजिला' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.