Sunjay Kapoor Last Rites: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती आणि बिजनेसमॅन संजय कपूर यांचं १२ जून रोजी निधन झालं. लंडनमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या ५३व्या वर्षी संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पोलो गेम खेळताना मधमाशी तोंडात गेली आणि तिने डंख मारल्याने संजय कपूर यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज(१९ जून) दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संजय कपूर यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व होतं. त्यामुळे त्यांचं पार्थिव भारतात आणण्यास काही अडचणी येत होत्या. अखेर, त्यांचं पार्थिव आज दिल्लीत आणण्यात येणार असून मृत्यूनंतर ७ दिवसांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, संजय कपूर यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीतील लोधी रोड येथे संध्याकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रविवार, २२ जून २०२५ रोजी संजय कपूर यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये ४-५ वाजता ही शोकसभा होणार आहे.
दरम्यान, संजय कपूर यांनी २००३ मध्ये करिश्मा कपूरशी लग्न केलं होतं. मात्र २०१६ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. करिश्मासोबत हे त्यांचं दुसरं लग्न होतं. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी मॉडेल प्रिया सचदेवशी संसार थाटला होता. त्यांना सफिरा आणि अजारियस ही दोन मुले आहेत.