Join us  

भाईजानच्या वाढदिवशी करण जोहरनं शेअर केला 25 वर्षे जुना ‘तो’ किस्सा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:00 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं सलमानसाठी खास पोस्ट केली आहे. 

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आज त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. आपल्या अभिनयाच्या स्टाइलने तसेच पिळदार शरीरयष्टीमुळे त्याने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. या निमित्ताने त्याच्यावर कुटुंबीय, चाहते आणि बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं सलमानसाठी खास पोस्ट केली आहे. 

करण जोहर आणि सलमान खान यांची मैत्री वर्षानुवर्षे जुनी आहे. करणने सलमान खानचा २५ वर्षे जुना फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, '२५ वर्षांपूर्वी मी एका पार्टीत गोंधळलेल्या अवस्थेत कोपऱ्यात उभा होतो. एक मोठा फिल्मस्टार माझ्याकडे आला आणि मला विचारलं की असा का उभा आहे. मी त्याला सांगितले की, मी आगामी सिनेमातील एका भागासाठी अनेक अभिनेत्यांकडे गेलो. परंतु सर्वांनी मला नकार दिला. या सुपरस्टारच्या बहीणीशी माझे चांगले संबंध होते. म्हणून त्या सुपरस्टारने दुसऱ्या दिवशी सिनेमाची गोष्ट ऐकण्यासाठी मला भेटायला बोलावलं'. 

'माझ्या स्वप्नांमध्ये सुद्धा मी या सुपरस्टारला माझी स्क्रीप्ट ऐकवेल याची कल्पनाही केली नव्हती. चित्रपटाची अर्धी स्क्रिप्ट ऐकवली आणि त्याच्या उत्तराची वाट पाहत होतो. तेव्हा मला सहारा वाळवंटातल्या तहानलेल्या व्यक्तीसारखं वाटलं, ज्याला पाण्याची गरज होती. त्याने मला पाणी दिलं आणि चित्रपट करण्यासाठी होकारही दिला. हे ऐकताच मी मात्र, आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, पण तुम्ही दुसऱ्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातआहात, तुम्ही हे ऐकले नाही का?  तर तो म्हणाला, माझं तुझ्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि जर मी हा चित्रपट केला नाही, तर माझी बहीण माझा जीवच घेईल'.

'तर हा सुपरस्टार म्हणजेच सलमान खान. त्याची KKHH (कुछ कुछ होता है) मध्ये एन्ट्री झाली. मी सलमानची बहिण अलविरा आणि माझ्या वडिलांचा मनापासून आभारी आहे. माझ्या चित्रपटात अमन म्हणजेच सलमान खान राहिल याची त्यांनी काळजी घेतली. असं माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या गोष्टी आज घडत नाहीत! सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा! खूप प्रेम आणि कायमचं तुझा आदर आहे. शिवाय 25 वर्षांनंतर आपल्याकडे सांग्यासाठी पुन्हा एक कथा असणार आहे. सध्या यापेक्षा जास्त काही सांगणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'. करणच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :करण जोहरसलमान खानबॉलिवूडसेलिब्रिटी